Tuesday, February 28, 2012

हजारो मुखांतून निनादले राष्ट्रगीताचे सूर..!



हजारो मुखांतून निनादले राष्ट्रगीताचे सूर..!

नव्या विश्वविक्रमाला समूह राष्ट्रगीताची गवसणी!

भारतीय राष्ट्रगीताच्या जन्मशताब्दीनिमित्त दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये हजारोंच्या संख्येने समूह सुरातजन गण मन..’ म्हणून ठाणेकर नागरिकांनी राष्ट्रभक्तीचे विराट दर्शन घडविले. १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी असा कोणताही राष्ट्रीय दिन नसतानाही सर्व वयोगटांतील ठाणेकरांनीदेश माझा मी देशाचा' या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत याबाबतच्या नव्या विश्वविक्रमास गवसणी घातली. या सोहळ्याचे ८० कॅमेरांनी चित्रीकरण करण्यात आले असून त्याची काटेकोरपणे तपासणी केल्यानंतरच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे.
       
१५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी असा कोणताही राष्ट्रीय सण नसतानाही भर दुपारच्या उन्हाची पर्वा करता हजारो विद्यार्थी आणि विविध वयोगटांतील नागरिक दुपारी तीन वाजल्यापासून मैदानात उपस्थित होऊ लागले. जय हो.., वंदे मातरम, मेरे देशकी धरती, मेरे वतन के लोगो, शूर आम्ही सरदार.. अशा अनेक देशभक्तीपर गाण्यांनी वातावरणनिर्मिती होत होती.
    पोलीस बॅन्ड, मल्लखांबांची प्रात्यक्षिके तसेच दिलखेचक समूह नृत्यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या रसिकांना खिळवून ठेवले. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आपापल्या शाळेचे फलक हाती घेत निरनिराळ्या दरवाजांनी मैदानात येत होते. काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर घातलेल्या टोप्यांनी मैदानात तिरंगा साकारला होता. अशा सर्वार्थाने भारलेल्या वातावरणात अखेरीस समूह सूरात राष्ट्रगीत म्हटले गेले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आणि भारती आमटे, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, खेळाडू सीमा शिरूर, कलादिग्दर्शक नितीन देसाई, या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
         कोणत्याही विक्रमासाठी नाही तर राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सतीश उतेकर यांनी  सांगितले.प्रत्येक शहरात अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.    

Bottom of Form

No comments:

Post a Comment