Saturday, July 13, 2013

विचारांची ताकद


विचारांची ताकद



अनेकदा आपण स्वत: काय आहोत यापेक्षा इतर लोक काय सांगतात त्यावर आपण आपलं आयुष्य घडवत असतो . शब्दांची जादू काही तरी जन्माला घालत असते. सकारात्मक काही घडवत असते. फक्त आपला त्या शब्दांवर विश्वास हवा. पण तोच कमी पडतो.
इथे मी एक कथा सांगतो बेडकाची :
 एका छोटय़ा बेडकाच्या मित्रांनी ठरवलं की, आपण धावण्याची शर्यत लावायची. एका उंच मनोऱ्यावर चढायचं होतं. त्या दहा-बारा बेडकांना प्रोत्साहन द्यायला त्यांची बरीचशी बेडूकमंडळी जमली होती. पण सगळ्यांचा सूर नकारात्मकच होता. कुणी म्हणत होतं, ''कसं शक्य आहे इतकी उंच चढण चढणं?'' कुणी म्हणत होतं, ''अशक्यच आहे. उगाचंच वेडेपणा करताहेत ही बेडकं.'' गर्दी मोठमोठय़ाने बोलत होती. काही अंतर चढल्यावर एकामागोमाग एक बेडूक खाली कोसळू लागले. काहींनी मात्र आपली जिद्द कायम ठेवली. ''मला नाही वाटत कुणी एक तरी पोहोचेल वपर्यंत.'' गर्दी बोलतच होती. उरलेल्या बेडकांमधला एकेक बेडूक खाली कोसळत होता. फक्त एक छोटा बेडूक मात्र सरसर वर सरकत होता. गर्दीचा आवाज आता क्षीण झाला होता. पण तो पुढे जातच राहिला आणि अखेर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलाच. साऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही. त्याच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी सारे त्याच्याभोवती जमले. तेव्हा लक्षात आलं, तो बहिरा होता. कुणाचं काही ऐकण्याच्या पलीकडे तो पोहोचलेला होता.
आयुष्यात आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करणारे अनेक लोक वा त्यांचे नकारार्थी विचार आपल्याबरोबर सतत असणारच आहेत. आपल्या सुंदर स्वप्नांपासून रोखणारे अनेक जण भेटणारच आहेत. आपण ते कानाआड करायला हवेत. अशा वेळी तुम्ही चक्क बहिरं व्हायला हवं. तुम्हाला काय हवंय, काय मिळवायचं आहे हे मनाशी पक्कं ठरवायला हवं. कारण आपल्या विचारांमध्ये कमालीची ताकद असते.
आयुष्यात सकारात्मक वा पॉझिटिव्ह विचारांची गरज पावलोपावली आपलं अस्तित्व जागवत असते. कारण तो विचारच तुम्हाला ताकद देत असतो पुढे जायची, काही घडवायची. तुम्ही जोपर्यंत स्वत:ला त्यासाठी तयार करत नाही तोपर्यंत निराशा येणं वा काहीच सकारात्मक न घडण्याचीच शक्यता जास्त असते. पण एकदा का त्यांची ताकद कळली की चमत्कारही घडू शकतात.

*@*स्वप्नील वाघमारे *@*