तू आणि तो
ए बाहेर बघ ना रे! आजही तो आलाच... जुन्या आठवणी म्हणलं की त्याचं येणं स्वाभाविकच म्हणा. कसा मोक्याच्या क्षणी येतो ना हा द्वाड!
आठव.. कॉलेजचा पहिला दिवस... बावरलेली मी आणि तितकीच धिटाई अंगात भरलेला तू. बसची वाट पाहत मी बस स्टँडला उभी होते आणि इतक्यात तू जवळ आलास. "कॉलेजचा पहिला दिवस वाट्टं" कसल्या आगावपणे विचारलेलस ना तू? आधीच बावरलेली मी त्यात अजुन गडबडले. हो म्हणे पर्यंत तुझा पुढचा प्रश्न "कुठलं कॉलेज?" आणि कॉलेजचं नाव ऐकताच "हायला तू माझ्याच कॉलेजातेस की..चल ऑटो करुन जाऊ" हा तू दिलेला आदेश!
जाम घाबरलेले हं मी तेंव्हा.."रॅगिंग होऊ शकत.सिनिअर्सशी पंगा घेऊ नकोस" हा मैत्रिणींचा सल्ला तात्काळ आठवला...म्हणुन गप्प गुमान तुझ्या सोबत ऑटोत आले. ऑटो सुरूही झाली नसेल तितक्यात पाऊस आलाच..तेंव्हा किती अखंड बडबडत होतास.बाहेर तो आणि आत तू... कोसळत होतात नुसते.माझी मात्र सॉलिड वाट लागलेली. तुला ते कळलं तसा एकदम शांतच झालास. हातावर अलगद हात ठेवुन तेंव्हा झुकवलेली मान मला सांगुन गेली.. "मी आहे ना"... कसला आधार वाटला होता तुझा तेंव्हा.
आपण पोहचलो आणि पाऊसही थांबला.कॉलेजात पाऊल ठेवलं तसा तुझाच गृप आला.
"वहिनी काय रे साल्या?", "आमच्यासाठी नाही केली ऑटो ती कधी".. तुझे मित्र मैत्रिणी तर अगदी सुटलेच होते. भांबावून गेले मी.. तुझ्याकडे पाहिलं तर तूही चक्क हसत होतास.
"तुम्ही निघा साल्यांनो! आलोच मी"
रागच आला मला तुझा. आणि त्यात कहर म्हणजे जाता जाता तू म्हणालेलास ते वाक्य... आजही ते तसच्या तस आठवतं.....
"आधीच तू भन्नाट दिसतेयेस, त्यात पावसानंही हवं तितकच भिजवलय तुला..काश मी पाऊस असतो"
बाप्रे! हे असलं काही ऐकायची सवय नव्हती कधी. एकतर आता तुझाच तर आधार वाटत होता आणि त्यात तूच हे असलं काही तरी म्हणतोयेस. प्रचंड रडायला आलं मला.
आणि मला रडताना बघुन तू जाम गोंधळलास
"ए अग रडू नकोस ना. मला 'तस' म्हणायचं नव्हतं.. तू खरच गोड दिसतेयेस. त्यात हे असे थोडेसे भिजलेले केस, तुझं ओढणीशी खेळणं, तुझे टपोरे डोळे. कोणालाही आवडशील अशीच दिसतेयेस तू"
वेडा! कधी काय बोलावं ते ही कळायचं नाही तुला. मी अजुनच रडायला लागले. तेंव्हा मात्र मगाशी हकलून दिलेल्या मैत्रिणींना हाक मारलीस. त्याही आल्या लगेच.तुला फटकवलं आणि मला तिथुन घेऊन गेल्या.त्यांनी समजावल्यावर मी शांत झाले खरी पण तुझ्याकडे न बघताच माझ्या वर्गात निघुन गेले.
त्या आठवड्यात म्हणे सगळ्या ज्युनिअर्सच थोड थोड रॅगिंग झालं. अर्थातच मी वगळता. तुझ्या गृपमध्ये मी ही रमायला लागलेले.तुझा गृप हळू हळू माझा कसा झाला कळलच नाही.पण मी काही तुझ्याशी बोलायला तयार नव्हते. मग काय आल्या आल्या हा असला झटका दिलेलास तू.माझ्या वर्गात मात्र माझं बाकीच्यांशी बोलण फक्त नोट्स शेअरींगसाठी. बाकी मी सतत तुमच्यात असायचे. माझ्यासमोर कोणी कधी मला चिडवलं नाही पण माझ्या मागे तुला चिडवायचे म्हणे माझ्यावरुन. मी मात्र चार महिने उलटून गेले तरी तुझ्याशी बोलले नव्हते. किती प्रयत्न केलेस नाही तू? अगदी मॅडमशीही माझ्याबद्दल बोलायचास अस ऐकलं होतं तेंव्हा. मला ना नेहमी विशेष वाटायचं बघ तुझं... पुर्ण कॉलेजचा लाडका होतास तू. अगदी कामवाल्या काकांनाही तूच लागायचास. आणि तूही कधी कधी चक्क त्यांच्या डब्ब्यातले पदार्थ खायचास. हँडसमही होतासच. त्यात गिटार वाजवायचास.. फुल्ल स्टाईलनी.. किती मुली जीव टाकायच्या तुझ्यावर.तुझ्याशी बोलायला अक्षरशः झुरायच्या. पण तू मात्र मी बोलत नाही म्हणुन तोंड पाडून बसलेला असायचास. तुझ्यासमोरुन सिरिअस तोंड करुन गेले तरी तू नजरेआड होताच मी पोट धरुन हसायचे.
त्या दिवशी तू कॉलेजला आला नाहीस. तस पहिल्या वर्षी तू तुफान कॉलेज बंक केलेलस पण त्या वर्षी मात्र तुझी अॅटेंडस अगदी १००% होती. कॉलेजात सगळ्यांनाच कारण माहीत होतं...तस तर मलाही माहित होतं पण मी मुद्दामच दाखवलं नाही तुला कधी ते.तर त्यादिवशी तू आला नाहीस म्हणुन श्रावणीला तुझ्याबद्दल विचारलं तर कळालं जरुरी कामात अडकलायेस. ए तेंव्हा तुला कोणी सांगितल नाही पण माहितीये मी तुझ्याबद्दल विचारताच सगळ्यांनी चिडवून चिडवून अगदी जीव नकोसा करुन सोडला होता माझा. दुसर्या दिवशी कळालं की वर्गातला एक जण आजारी होता म्हणुन पुर्ण दिवस त्याच्या मदतीसाठी त्याच्या हॉस्टेलवर थांबला होतास. आणि त्याचं दुसर्या दिवशी सबमिशन होतं म्हणुन त्याला फाईल पुर्ण करून दिलीस.स्वतःची फाईल श्रावणी, मेघना कडून लिहून घ्यायचास तू..त्यात तो मुलगा आपल्या गृपचा नसतानाही? का तर सबमिशन नसतं केलं तर त्याला प्रॅक्टीकल परिक्षेला बसू दिलं नसतं म्हणुन. हे असलं काही अपेक्षितच नव्हतं तुझ्याकडून...धक्का होता रे तो माझ्यासाठी. तुझं हे रूप खुपच नविन होतं. तेंव्हा कळलेलं की पुर्ण कॉलेजचा लाडका का आहेस तू ते. त्यादिवशी दुसर्यांदा मी तुझ्याशी बोलले. वेडा! किती आनंद झाला होता तुला.
चक्क पार्टी डिक्लेअर करून टाकलीस्.सगळ्यांना आनंदात उड्या मारताना पाहून तेवढ्यातल्या तेवढ्यात मला मिठी मारलीस. आगाव! पुन्हा चिडले असते खर तर. पण तुझा तो आनंद पाहून मला उगाच खुप 'सहीsss' (तुझाच शब्द) वाटतं होतं. आणि...
नेहमी प्रमाणे "तो" पुन्हा आला. आजही तो आणि तू सारखेच होतात.. मला चिंब भिजवत होतात......तो सरींनी आणि तू शब्दांनी...
देवा! तू दमायचा नाहीस का रे माझं कौतुक करुन करुन. कधी कधी मीच वैतागायचे.
लोकं म्हणायची तुझा ड्रेस छान आहे. तू म्हणायचास तू घातलायेस म्हणुन ड्रेस छान दिसतोय. कोणी म्हणलं तुझा पर्फ्युम छान आहे की तू म्हणणार तूझ्यामुळे तो पर्फ्युम सुगंधी झालाय. कोणी तुझ्या हातातली गुलाब छानेय तर तू म्हणणार त्या हातामुळे गुलाब छान दिसतोय. सुचायचं ही तुला पटकन. एकदा आठवतय मी म्हणालेले मला पावसात भिजायला फार आवडतं तर म्हणालेलास फक्त तुला भिजवायलाच तर तो परत परत येतो. मला एकदा म्हणालास की तुझा आवाज इतका गोड आहे की रोज मी सकाळी तुला फोन करतो आणि साखर न घालता चहा पितो. केवढी हसलेले मी तेंव्हा! तुझ्या घरी गेलेलो तेंव्हा कळलं की खरच तू असच करायचास. अरे किती वेडा होतास तू.!
आणि एकदा मी बसच्या गर्दीला वैतागुन कॉलेजला आले तर दुसर्यादिवशी तू बाईक घेऊन आलास. इतके दिवस बाईक कुठे होती म्हणलं तर म्हणालास घरी ठेवलेली, तुझ्यासाठी बसने यायचो.मग मात्र मी वैतागलेच.येणारच नाही म्हणलं बाईकवर तुझ्यासोबत. आणि तू पण बसने यायचं नाहीस. शपथच घातलेली तुला.. तू मात्र धन्य होतास. माझ्या बस सोबत बाईक चालवायचास. एकदा एका कारवाल्याला तुझ्यामुळे पुढे जाता येईना तेंव्हा किती शिव्या खाल्या होत्यास त्याच्या. पण गाडी मात्र बसच्या बरोबरच चालवलीस. आणि माझ्याखेरिज इतर कोणाला मागच्या सिटवर बसुही दिलं नाहीस्.सारखं अस गोड वागल्यावर किती दिवस नाही म्हणणार होते मी? मग तयार झाले गाडीवर यायला.
तेंव्हा मात्र म्हणालास "आज नको! उद्या कॉलेजला जाताना घेऊन जाईनसोबत" तू ना अगम्य वैगेरे होतास बघ.
दुसर्या दिवशी मी तुझ्या घरात पाऊल टाकलं नसेल तेवढ्यात ’आय एम रेडी’ म्हणत तू हजर. तू आणि ऑन टाईम???? एक क्षण वाटलं स्वप्नात तर नाही ना मी. कारण पुर्ण वर्षभर तुझ्या उशीरा येण्याच्या कहाण्या ऐकुन होते गृपकडून.
चल म्हणालास. आणि पुढे नेहमीप्रमाणे "केस बांधू नकोस..सेक्सी दिसतात खुप मोकळे केस" अरे काय अरे हे! स्वतःच्या आईसमोर हे असलं काही बोलताना काहीच नाही वाटलं तुला? माझी हिंमतच झाली नाही काकुंकडे वळून पहायची.
मला रस्ते लक्षात रहात नाहीत हे तुला चांगलच माहीत होतं. पण अगदी लक्षात नाही राहिले तरी बदललाच रस्ता तर किंचितस जाणवायच मला.
"ए हा आपल्या कॉलेजचा रस्ता नाहीये. कुठे जातोय आपण?"
"आपण कॉलेजला जातच नाहीये मुळी!"
"काsssssssय! कुठे नेतोयेस मला? थांबव गाडी. मला कॉलेजला जाऊ देत"
रडकुंडीला आलेले मी. सारखं असच काही तरी करायचास तू.
आणि तेंव्हाही अगदी ठामपणे माझे हात हातात घेऊन म्हणालेलास "तुला एकीला भेटवायचय. चल ना ग प्लिज"
इतके करूण भाव वैगेरे आणलेस डोळ्यात की वाटलं लोटांगण वैगेरे घालतोस की काय आता. आणि तसाही तुझा भरवसा नव्हता खरच लोटांगण घालायलाही मागे पुढे पाहिलं नसतस तू.म्हणुन तयार झाले मी तुझ्यासोबत यायला. आणि गाडीवर तू बोललेल्या वाक्याची उजळणी केली. काय म्हणालेलास? कोणाला तरी भेटवायचय. आकाशात विज कडाडावी तसे लाखो विचार आले डोक्यात. कोणाला भेटवणारेस? खुप चलबिचल होत होती मनाची. पहिल्यांदाच तुला थोडंस टेन्स्ड आणि बरचसं शांत पाहत होते. एक क्षण तुझ्या त्या "एकीचा" मला प्रचंड राग आला आणि हेवा वाटला..कोण कुठली ती आणि तिला भेटायला तू मला कॉलेज बंक करून घेऊन चालल्लायेस.
सहजच विचारलं "कोणेय रे ती?"
तर म्हणालास " आहे एक कोणी तरी! ती जन्मली ना तेंव्हा नक्कीच पाऊस पडत असणार बघ"
"का ते?"
"मग इतकं सुंदर नक्षत्र जमिनीवर पाठवल्याबद्दल आकाशाने टाहो फोडला असेलच की"
"हं! ( मनात : इतके दिवस हे सगळं मला म्हणत होता हा!")
"आणि जेंव्हा ती चालायला लागली ना तेंव्हा नक्कीच शिशिर ॠतू असेल"
"आता हे का?"
"मग तिची पावलं जमिनीवर पडतातच झाडांनी आपल्या पाना-फुलांच्या पायघड्या घातल्या असतील ना.."
"पानगळ म्हणतात त्याला.. म्हणे पायघड्या"
"सामान्यांसाठी पानगळ ग! खर्या पायघड्याच!"
"बरssss!"
"आणि बासरी... ती वाजणं विसरली असेल"
"हे कशाने आता?"
"तीच हसणं बासरीपेक्षा मधुर आहे ना"
"हं आता तुला साखरेचा चहा प्यावा लागणार बहुदा. बासरीचे सुर चहात घालून पिता येत नाहीत ना"
मी तेवढ्यातल्या तेवढ्यात टोमणा मारून घेतला. आणि तू चक्क दुर्लक्ष केलस.
कुठुन विचारलं याला अस झालं होतं मला!
"कधी पोहचणारेय आपण? मला बरीच काम आहेत बाकीची"
"चल उगाच काहीही सांगू नकोस! आज तू पुर्ण दिवस फ्री आहेस. मला माहित आहे"
"तुला रे काय माहित?"
"आधीच माहिती काढुन ठेवलीये मी"
"बरा वेळ मिळाला माझी माहिती काढायला तुझ्या अप्सरेमधुन"
तेंव्हा मात्र तू गाडीच्या आरशातून माझ्याकडे पाहिलस.तसे मी केस बांधुन टाकले. आणि तू चक्क हसलास. मला वाटलेलं की म्हणशील 'राहू देत ना केस तसेच. नको बांधुस', पण तू चक्क हसलास. तेंव्हा मात्र मला नेहमी प्रमाणे रडायला यायला लागलं. माझ्याकडे तू त्यादिवशी चक्क दुर्लक्ष करत होतास. खास तुझ्यासाठी मी तुझा आवडता गुलाबी ड्रेस घातला होता. सकाळपासून "गोड दिसतेयेस" हे ऐकण्यासाठी किती तयारी केलेली. कान असुसले होते माझे. त्या ऐवजी कोण कुठली ती "ती", तीच कौतुक चालवलेलसं. जाम रडायला येत होतं. तुला माझे डोळे असे भरून आले की खुप आवडायचे." हिचे डोळे छान की ओठ यावर तू एक प्रबंध लिहिशील" असं म्हणाली होती ना तुला श्रावणी? पण तो दिवशी मला तेही जमल नाही. त्या आधीच आपण पोहचलो. खडकवासल्याला!
तुला हिच जागा मिळाली का? मला आवडायचं खडकवासलाला जायला. तिथल्या पाण्यात पडणार माझं प्रतिबिंब निरखायला.
"नाही नाही ना ग म्हणणार ती?"
"का म्हणेल नाही?"
"कुणास ठाऊक मी तिच्यासाठी योग्य आहे की नाही. नकार नाही पचवू शकणार तिचा मी. आता तिच्याशिवाय जगणं कठिण आहे. ए तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? ती नाही म्हणली तर समजावशील तिला? माझं खुप प्रेम आहे तिच्यावर. माझ्यासाठी तीच सर्वस्व आहे. दुसरं कोणीही नसेल तरी चालेल मला. समजावशील ना ग?"
मी तुझा हात हातात घेतला तेंव्हा, पण फक्त एकच शब्द बोलू शकले "हं!"
"थांब इथेच! मी आलोच तिला घेऊन" माझ्या उत्तराची वाटही न पहाता निघालास.
मी मात्र त्या पाण्याकडे एकटक पाहत राहिले. आज माझं प्रतिबिंब उदासच दिसणार होतं. मी एक दगड मारला पाण्यात. लाखो तरंग उठले. असेच तरंग उठवलेलेस रे माझ्या जीवनात. माझ्याही नकळत मी तुझ्यावर प्रेम करायला लागलेले. तूही कसा ना. मला स्वप्न दाखवलीस. आणि मी ती माझ्या डोळ्यांनी पाहिला लागले तर जागं केलस. का रे वागलास असा?
"त्याची काय चुक ग? त्याने कधी सांगितल तुला की स्वप्न बघ? तूच पाहिलीस ना?" माझं प्रतिबिंब मला विचारत होतं.
तू आल्याची चाहूल लागले. तस पटकन चेहर्यावर उसनं हासू आणलं. तुझ्या आनंदात माझ्यामुळे विरजण नको म्हणुन.
मागे पहिलं तर तू एकटाच!
"कुठे आहे रे ती?"
"ती? दिसली नाही तुला? अशी कशी दिसली नाही? नीट बघ बर!"
माझंच प्रतिबिंब मला पुन्हा दाखवलस
"आता दिसली?"
क्षणभर मला काही समजलच नाही. ब्लँक झालेले मी. "ती" मी च आहे? खरचं?????????
किती पटकन वाचलस ना माझं मन?
"तुझ्याशिवाय कोण?"
त्यावेळेला निशब्द झालेले मी.
अशक्य आहेस तू....
तुला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात "तो" आलाच.....
पण आता या वेळेला मात्र तो आणि मी सारखे होते... भरून आलेले...
जागेचं भान आल्याने तुझ्या मिठीतुन बाजुला झाले. तेवढ्यात म्हणालास
"गोड दिसतेयेस आणि हो मला बासरी ऐकता ऐकता साखर टिपण्याची सवय आहे बर का."
पुन्हा तुझ्या मिठीत शिरले.. त्याक्षणी तुझ्यापासून दुर होण्याची इच्छाच होत नव्हती. आता यावेळेला पाऊस आपल्या प्रेमासारखा होता.... धुंद....
परतीच्या वाटेकडे निघालो तसा पावसाने जोर घेतला. भलताच खुषीत होता तो ही. एक प्रेम कहाणी फुलताना पाहिली होती ना त्याने. पण बाईक चालवणं अवघड झालं म्हणुन एका झाडाखाली थांबलो आपण. आठवतय? थंडीनी कुडकुडत होते मी.आणि तू मज्जा पाहत होतास.अंगभर चिकटलेले माझे कपडे. जवळ आलास आणि हळूच कानात म्हणालास," I want to kiss you now"
मला काय react करू तेच कळेना. नाही चिडले नव्हतेच मी. त्याक्षणी मलाही तेच हवं होतं.वाचलस ना ते चेहर्यावर?
थरथर कापत होते मी. तुला जवळ येताना पाहून डोळे अपोआप मिटले गेले. पुढचे काही क्षण मी फक्त अनुभवले. पाऊस पण किती खट्याळ ना! तेवढ्याच क्षणासाठी कोसळला. मग शांत झाला.आपणही बाजुला झालो.
"आज मला एक गोष्ट कळाली पण?"
"काय?" नजरही वर न उचलता मी तुला विचारलं.
"अमृताची चव कशी असेल ते" ... माझ्याही नकळत गालावर एक लाली पसरली.
"बास की अग! अजुन किती गोड दिसणारेस?" अस म्हणुन पुन्हा जवळ आलास. तस तुला दुर ढकललं मी....मनाच्या बंद कुपीत मला तो तेवढाच अनुभव जपुन ठेवायचा होता.
आता सगळ जगच आपल्यासारखं भासत होतं.....तृप्त!
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
लेखिका: रिया
No comments:
Post a Comment