Sunday, May 25, 2014

आयुष्य परिपूर्ण करण्यापेक्षा अधिक साहसी बनवा!





प्रसिद्ध अमेरिकन इंटरनेट उद्योजक- 'ड्रॉपबॉक्स'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ड्रय़ू ह्य़ुस्टन यांनी एमआयटी या जगप्रसिद्ध विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या विचारप्रवर्तक भाषणाचा भावानुवाद.
पुन्हा एकवार एमआयटीमध्ये आल्याने मला आनंद होत आहे. तुम्हा सर्वामध्ये असणे हा मी माझा सन्मान समजतो. आजही मी माझ्या पदवीदान प्रसंगी (२००५) मिळालेली ब्रासची अंगठी वापरतो. तो प्रसंग माझ्या जीवनातील एक सर्वोच्च अभिमानाचा क्षण होता.
तुम्ही आज इथवर पोहोचलात ते प्रामुख्याने तुम्ही हुशार आहात आणि तुम्ही कठोर परिश्रम घेतले आहेत म्हणून. पण यापुढे यशप्राप्तीची प्रक्रिया वेगळी असणार आहे, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला एक छोटीशी फसवी अशी यादी देणार आहे. ती म्हणजे- एक टेनिसचा चेंडू, एक गोल वर्तुळ आणि एक ३०,००० हा आकडा. मला ठाऊक आहे की यातून तुम्हांला काहीच बोध होणार नाहीये.
मी माझी पहिली कंपनी चिलीत काढली तेव्हा माझे वय होते २१. माझा जोडीदार होता अँड्रय़ू क्रिक. मला कसलाही पूर्वानुभव नव्हता. पण आम्ही धंद्यात उतरलो होतो. सॅट (SAT) चा ऑनलाइन कोर्स चालू करण्याचा आमचा अभिनव विचार होता. त्या काळात बरीच मुले जुनी ८०० पानी पुस्तके वापरत होती आणि अन्य प्रचलित ऑनलाइन गृहपाठ कोस्रेस फार काही चांगले नव्हते. आम्ही अॅकोलेड ग्रुप, एलएलसी असे जरा भारदस्त नाव दिले. (अॅकोलेड म्हणजे पसंती, प्रशंसा). आमची पहिली महत्त्वाची ऑर्डर होती एक लोगो घेऊन बिझनेस कार्र्डस् छापायची ज्यावर Founder असे लिहिले असले पाहिजे. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. दोनएक वर्षांनंतर गोष्टींना उतरती कळा लागली. काहीतरी चुकत होते. काहीच करता येत नसल्याने मला अपराधी वाटायला लागले. मी कुठेतरी कमी पडत होतो.
मी थोडेसे थांबायचे ठरवले. शॉवर घेताना, मध्यरात्री अगदी केव्हाही माझा विचार चालू असायचा. अचानक स्विच चालू होऊन जणू माझे यंत्रच झाले होते. यामध्ये अजून एक भर पडली. माझे आईवडील गेटटुगेदरसाठी न्यू हॅम्पशायरला आठवडय़ाअखेरीस येणार होते. पण मी माझ्यातच दंग होतो. मी ट्रंक उघडली आणि संगणकाचे साहित्य आणि वायर्स त्या छोटय़ाशा घरात बाहेर काढल्या. त्याला जागा करून देताना मी भांडी, तवे इ. हलवायला सुरुवात केली. या वेळी आईला मात्र वाटले की, काहीतरी चुकीचे घडतेय. मला जेलमध्ये जावे लागेल, याबाबत तिची खात्री झाली.
मला सांगायचे आहे की, तुम्हाला जे आवडते आहे त्यावर काम करा. पण हे काही खरे नाही. मला माहीत असलेल्या अत्यंत समाधानी आणि यशस्वी व्यक्ती ते करीत असलेल्या कामावर फक्त प्रेम करतात असे नाही, तर ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्यापुढे असलेल्या महत्त्वाच्या समस्येवर उत्तर शोधण्यात पूर्णपणे दंग असतात. यावरून मला टेनिस चेंडूच्या मागे धावत असणारा कुत्रा डोळ्यासमोर येतो, त्याचे डोळे जरासे वेडसर होतात, तो वेगाने धावतो, उडय़ा मारतो, उलटा फिरतो आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यातून मार्ग काढतो. तो त्यातच दंग असतो. समस्या ही आहे की अनेक व्यक्तींना त्यांचा टेनिस चेंडूच सापडत नाही.
विचार करा की, तुमच्या आसपास पाचजण कोण आहेत? इथे मी तुम्हाला एक चांगली बातमी देतो. एमआयटी ही जगातली उत्कृष्ट जागा आहे जिथे तुम्हाला उत्तम मित्रमंडळ लाभते. मी जर इथे आलो नसतो तर माझी अॅडमशी, तसेच माझा अद्भुत भागीदार अरश याच्याशी माझी गाठ पडली नसती आणि मग ड्रॉपबॉक्सचा उदयही झाला नसता.        
तुम्ही हुशार आहात किंवा अपार कष्ट करीत आहात, याबरोबरच तुमच्या भोवती किती प्रेरणादायी लोक आहेत हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमचे मित्रमंडळ तुम्हाला अधिक चांगले होण्यास भाग पाडते. तुमचे हे वर्तुळ यापुढे तुमच्या सहकाऱ्यांना व तुमच्याभोवती असणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेत मोठे होणार आहे. तुम्ही कुठे राहता याला फार महत्त्व आहे. एमआयटी एकच असते, हॉलीवूड एकच असते आणि सिलिकॉन व्हॅलीही एकच असते. हा योगायोग नसतो, तुम्ही जे काही करत असता त्यासाठी साधारणपणे एकच असे ठिकाण असते जिथे बरीच उच्च दर्जाची मंडळी असतात. तुम्ही तिथेच जा. दुसरीकडे कुठेही स्थिरस्थावर होऊ नका. माझ्या आदर्शाना भेटता आल्याने व त्यांच्याकडून खूप काही शिकता आल्याचा मला खूप लाभ झाला. तुमचे आदर्श हे नक्कीच तुमच्या वर्तुळाचा एक भाग असतात, त्यांचे अनुसरण करा. 
इथून बाहेर पडल्यानंतर अखेरचा सापळा असेल तो म्हणजे, तयार असण्याचा. शिकणे ही तुमची सर्वोच्च प्राधान्य देण्याची गोष्ट आहे, पण आता सर्वात गतिमान मार्ग आहे तो प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी अभ्यास करण्यात, नियोजन करण्यात व तयार होण्यात तुम्ही अख्खे आयुष्य खर्चू शकाल. पण तुम्ही जे काही प्रत्यक्षात करायला लागाल तीच तुमची खरी सुरुवात असेल.
ड्रॉपबॉक्स ही माझी कंपनी आहे. तुमची अपेक्षा असणार की ही कंपनी उभारणे म्हणजे माझ्या आयुष्यातील एक छान सुखद स्वप्नपूर्तीचा असा अनुभव असणार. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तो एक अत्यंत मानहानीकारक, निराशादायी आणि दु:खदायी असाही अनुभव होता. त्याकाळात घडलेल्या चुकीच्या गोष्टींची गणनाही मी करू शकणार नाही.
कुणालाही वास्तव आयुष्यात 5.0 (ग्रेड) मिळत नाहीत. वस्तुत: जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडता तत्क्षणी GPA  (Grade Point Average) ची संपूर्ण कल्पनाच चालली जाते. कॉलेजमध्ये असताना तुमची प्रत्येक चूक ही जणू िवडशील्डवर पडलेला कायमचा तडा असतो. पण जगात जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही तुमची कार जलद वेगाने चालवूच शकणार नाही. तुमची सर्वात मोठी जोखीम 'अपयश' ही नसून 'अति-समाधानी असणे' ही होय.
बिल गेट्सची पहिली कंपनी होती ट्रॅफिक सिग्नलसाठी सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) बनवण्याची. स्टीव्ह जॉबच्या पहिल्या कंपनीने प्लास्टिक शिट्टय़ा बनवल्या, ज्यामुळे फुकट फोन कॉल्स करणे शक्य होईल. दोघांनाही अपयश आले. पण म्हणून त्यांना निराशा दाटून आली असेल अशी कल्पनासुद्धा करणे नको. एकूण किती वेळा अपयश आले हा नंबर बरोबर घेऊन फिरणे थांबवायचे आहे. यापुढे अपयशाने काहीच बिघडत नाही, असे ठरवून एकदाच स्वत:ला सिद्ध करायचे आहे.
मला प्रत्येक गोष्टीची काळजी करायची सवय होती. सॅन फ्रान्सिस्कोला वास्तव्याला असताना मला एका रात्री झोप येईना. लॅपटॉपवर मी ऑनलाइन काहीतरी वाचले की, तुमच्या आयुष्यात ३०,००० दिवस असतात. प्रथम मला या वाक्याचे विशेष काही वाटले नाही. पण लगेच मी गुणाकार केला २४ गुणिले ३६५. थोडक्यात सुमारे ९ हजार दिवस संपले होते. मी काय करत होतो?
त्या रात्री मला उमगले की, पूर्वतयारी, अनुभव, रीसेट बटन्स असे काही नसते. प्रत्येक दिवशी जीवनकथेतले थोडे थोडे शब्द तुम्ही लिहीत असता. जेव्हा जीवनाचा शेवट येतो तेव्हा असे काही असत नाही की, पाहा निकाल. त्याचा नंबर १७२ वा आला. रात्रीच्या त्या क्षणापासून माझे जीवन परिपूर्ण करण्याचा माझा अट्टहास मी थांबवला. त्यापेक्षा ते अधिक रंजक, साहसी कसे करता येईल याचा प्रयत्न करू लागलो आणि माझे जीवनच बदलून गेले.
माझी ९५ वर्षांची आजी प्रत्येक वेळी फोन ठेवताना ती एक शब्द उच्चारते तो म्हणजे सर्वोत्कृष्ट! (Excelsior).
आज या पदवीदान प्रसंगी, तुमच्या वास्तव जगातील पहिल्या दिवशी, मी तोच शब्द वापरतो. सर्वोत्कृष्ट ! (Excelsior) तुमचे आयुष्य परिपूर्ण करण्यापेक्षा तुम्ही ते अधिक साहसी होईल याकडे लक्ष द्या आणि सतत प्रगतीकडे वाटचाल करा. 


                                                                                                            ----------Loksata Article ----------
                                                                                                                                www.swapneel.in

No comments:

Post a Comment