Monday, May 27, 2013

संघर्ष, स्वत:चा स्वतशी ............





                        संघर्ष, स्वत:चा स्वतशी

 

            जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही गरजेचं आहे. यासाठी माणसालाही संघर्ष करावाला लागतो स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..
          सुरवंटाचं फुलपाखरू होण्यापर्यंतची प्रक्रिया फारच जीवघेणी असते. एका अत्यंत कुरूप किडय़ाचं देखण्या फुलपाखरात रूपांतर होणार असतं, त्यासाठी त्याला करावा लागतो जीवघेणा संघर्ष, स्वत:च स्वत:शी केलेला. एकटय़ाने..
          असाच एक फुलपाखरू, धडपडत होता कोषातून बाहेर यायला. त्यापूर्वीचा  सुरवंटाचा संघर्ष आता संपला होता. प्रचंड कष्टाने त्याने स्वत:भोवती कोष विणून स्वत:लाच घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. आता प्रतीक्षा होती कोषातून बाहेर यायची. फुलपाखरू बनण्याचा क्षण आता काही मिनिटांच्या अंतरावर वाट पाहत अधीर झालेला. त्याचं कोषातून बाहेर पडणं निश्चित होतं. कोष फाडून तो किंचित बाहेरही आला. तारेसारख्या पायाचं स्वत:ला उभं करण्यासाठी धडपडणं सुरू होतं..
             हे सगळं एक माणूस बघत होता. थोडा जरा जास्तच संवेदनशील होता तो. बुद्धीपेक्षा मनाने विचार करणारा. फुलपाखराची ती धडपड त्याला अस्वस्थ करू लागली. मी याला मदत करू शकतो का? त्याने स्वत:लाच प्रश्न केला. तेवढय़ात बराच वेळ धडपडणारा तो कोष अचानक स्तब्ध झाला.. काही काळ. आता मात्र काहीतरी करायला हवं, त्याच्या हळव्या मनानं सांगितलं. तो कात्री घेऊन आला. आणि त्याने हलक्या हाताने कोषाचा तो पातळ पापुद्रा कापून विभक्त केला. तो वाट पाहत राहिला.. आता फुलपाखराला सहज बाहेर पडता येईल.. आपले रंगीबेरंगी पंख पसरून तो हवेत मस्त विहरेल.. पण तसं काहीच घडलं नाही. त्याचं अंग सुजू लागलं आणि पंख कोरडे पडू लागले. पंख मोकळे होण्याएवजी अर्धवट मिटलेलेच राहिले.. आता ते कधीच फुलू शकणार नव्हतं. फुलपाखरू कायमचं अपंग झालं होतं.. त्या माणसाला हे कळलं की आपण दाखवत असलेली दया त्या फुलपाखराला कायमची अपंग बनवून टाकणारी ठरलीय, पण खूप उशीर झाला होता. कोषातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी संघर्ष करणं ही फुलपाखरावर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी होती. त्यासाठी होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारं द्रव्यच त्याला कोषापासून विलग करण्यास मदत करणारं होतं, परंतु त्या माणसाच्या दयेमुळे ना संघर्ष उरला होता, ना त्यातून मिळणारा स्वत:ला सिद्ध करण्याचा आनंद. आता उरलं ते फक्त केविलवाणं जगणं. फुलण्याशिवायचं, विहरण्याशिवायचं!
             आपलंही आयुष्य असंच असतं. पुढे जाण्यासाठी, स्वप्नांमागे धावण्यासाठी संघर्ष गरजेचाच असतो. आणि तो आपला आपणच करायचा असतो. तरच सोन्यासारखं तावूनसलाखून लखलखीतपणे बाहेर पडता येतं. आपल्याला कुणीतरी फक्त घास भरवू शकतो. पण तो घास चावायचा मात्र आपल्यालाच असतो. दुसऱ्याच्या कुबडय़ा आपल्याला फक्त अपंगत्वच देतात. उठून उभं राहायची ताकद आपली आपणच मिळवायची असते. त्यासाठी संघर्ष महत्त्वाचा.. तो आपल्याला घडवत असतो. आपल्यातल्या सुरवंटाचं फुलपाखरू घडवत असतो..
              खूप काही घडवण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा, तसं खूप काही टाकून देणंही. ते सोपं नसतंही अनेकदा, पण आयुष्य पुढे न्यायचं असेल तर प्रयत्न करणं अपरिहार्य असतं.
              आपल्याही आयुष्यात असे जुने काही असतेच. कटू आठवणी, जीवघेणे अनुभव, अपयशाचं ओझं. जोपर्यंत ते आपण टाकत नाही. नव्या अनुभवासाठी स्वत:मध्ये नवी जान भरत नाही, तोपर्यंत नवं आयुष्यही आपल्याला कवेत घ्यायला उत्सुक नसतं. भूतकाळ बरोबर घ्यायचा नसतोच. नाही तर वर्तमानाला जागाच उरत नाही. आणि मग उज्ज्वल भविष्याला तर नाहीच नाही.. 
              जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही. यासाठी माणसालाही संघर्ष करावा लागतो..  स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..



*@*   स्वप्नील  वाघमारे   *@*

No comments:

Post a Comment