Thursday, January 19, 2012



पैसा मिळविण्याची इच्छा ............

आजच्या तरुणांचे जे प्रश्न आहेत, तेच शंभर वर्षांपूर्वीही त्या वेळच्या सामान्य तरुणाचे होते.. तेव्हा त्यांना उत्तरे द्यायला होते स्वामी विवेकानंद! ‘स्वामी विवेकानंदांच्या सहवासात’ या रामकृष्ण मिशनच्या पुस्तकातला हा संपादित अंश आज, विवेकानंदांच्या १५० व्या जयंती-वर्षांच्या प्रारंभीही विचारप्रवृत्त करणारा ठरेल.. स्वामीजी सन १८९८ मध्ये बेलूर येथील भाडय़ाच्या जागेत राहात.  शिष्य सकाळीच त्या मठात आला. स्वामीजींना वंदन करून तो उभा राहताच ते त्याला म्हणाले, ‘‘अशीच नोकरी करीत राहिल्याने तुला काय लाभ होणार आहे आयुष्यात? त्यापेक्षा तू दुसरा काही व्यापारधंदा कर.’’ शिष्य त्यावेळी एके ठिकाणी खासगी शिक्षकाचे काम करीत असे. संसाराचा भार अद्यापही त्याच्या खांद्यावर पडला नव्हता. आनंदाने त्याचे दिवस जात होते. ‘‘शिक्षकाचे काम करीत राहिल्याने माणसाची बुद्धी मठ्ठ होते. त्याच्या ज्ञानाचा कधी विकासच होत नाही. रात्रंदिवस पोरासोरांतच राहिल्याने तो अगदी जडवत होऊन जातो. यापुढे तू मास्तरकी करू नकोस.’’
शिष्य: तर मग काय करू?
स्वामीजी: का बरे? जर तुला संसारच करावयाचा आहे, पैसा मिळविण्याची इच्छा आहे, तर मग जा अमेरिकेस. धंदा मी शिकवतो तुला. पाहशील पाच वर्षांत कितीतरी पैसा कमावू शकशील.
शिष्य: कसला व्यापार करू? आणि त्या व्यापाराला लागणारा पैसा तरी कुठून आणू?
स्वामीजी: एखाद्या पागलासारखी काय बडबड करतो आहेस? तुझ्यात अदम्य शक्ती आहे. फक्त ‘मी म्हणजे कुणी नाही’ असा विचार करून करूनच तू असा निर्वीर्य झाला आहेस. फक्त तूच का, सारा देशचा देश तसा झाला आहे. जरा एकदा जग हिंडून ये म्हणजे भारतेतर देशातील लोकांचा जीवनप्रवाह कसा स्वच्छंदाने आणि आनंदाने वाहतो आहे, कसा प्रबल वेगाने वाहतो आहे ते तुला दिसून येईल आणि तुम्ही लोक काय करता आहात? इतके शिकून-सवरून, एवढी विद्या कमावून दुसऱ्यांच्या दारी भिकाऱ्यांसारखे ‘नोकरी द्या, नोकरी द्या’ म्हणून केकाटता आहात! जोडे खाऊन खाऊन, गुलामी करून करून तुम्ही काय आता माणसे राहिला आहात? जेथे निसर्ग इतर साऱ्या देशांपेक्षा कोटी कोटी पटींनी अधिक अन्नधान्य उत्पन्न करतो अशा सजल, सुफल देशात जन्माला येऊनही तुमच्या पोटी अन्नाचा कण नाही, अंगाला वस्त्र नाही. अन्नपूर्णेचा वरदहस्त असणाऱ्या ज्या या देशातील धनधान्याने इतर साऱ्या देशात सभ्यतेचा विस्तार केला, त्या या देशात तुमची घोर दुरवस्था असावी ना? आणि तरीही तुम्ही आपल्या वेदवेदान्ताची घमेंड मारता! जो देश अत्यंत मामुली अन्नवस्त्राचीही आपली गरज भागवू शकत नाही, त्यासाठी ज्याला दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहून आपले जीवित कंठावे लागते, त्या देशाने वर असली घमेंड मारावी! धर्मकर्म सारे गंगेत बुडवून आधी आता जीवनसंग्रामात पुढे व्हा. भारतात किती विविध वस्तू होतात. विदेशी लोक तो सारा कच्चा माल नेऊन त्याच्या साह्याने सोने पिकवतात, आणि तुम्ही भारवाही गाढवांप्रमाणे, त्यांनी आणलेला माल वाहून मरता. भारतात जो कच्चा माल उत्पन्न होतो तो देशोदेशींचे लोक नेतात, आपली बुद्धी चालवून त्यातून नाना प्रकारच्या वस्तू तयार करतात व मोठे होतात; आणि तुम्ही आपली बुद्धी पेटीत बंद करून टाकून घरातले धन दुसऱ्यांना वाटून देऊन ‘अन्न, अन्न’ करून भीक मागत हिंडता आहात.
शिष्य : अन्नसमस्या कशी सुटू शकेल?
स्वामीजी : उपाय तर तुमच्या हाती आहे. डोळ्यांवर पट्टय़ा बांधून तू म्हणतोस, ‘मी आंधळा, मला काहीही दिसत नाही.’ डोळ्यांवरची पट्टी दूर कर म्हणजे दिसेल की मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाने सारे जग प्रकाशित झाले आहे. पैसे जमू शकत नसतील तर जहाजावर एखादी नोकरी धरून परदेशात जा. देशी कापड, पंचे, सुपे, झाडण्या डोक्यावर घेऊन युरोपच्या, अमेरिकेच्या रस्त्यांवरून हिंड विक्री करीत. पाहशील, अजूनही भारतात तयार झालेल्या वस्तूंचे काय मोल आहे ते. अमेरिकेत हुगळी जिल्ह्यातील कितीतरी मुसलमान अशा तऱ्हेने फेरीवाल्यांचा धंदा करून श्रीमंत झालेले दिसतात. त्यांच्यापेक्षा काय तुमची बुद्धी, विद्या कमी आहे? या देशात जी बनारसी साडी होते, तसले उत्कृष्ट कापड साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर इतर कुठेही तयार होत नाही. तू हेच कापड घेऊन अमेरिकेला जा. तेथे या कापडाचे झगे करून वीक, पाहशील कसा पैसा मिळतो ते.
शिष्य : पण महाराज, बनारसी साडय़ांचे झगे तिथल्या स्त्रिया काय म्हणून घालतील? मी तर ऐकले आहे की असले रंगीबेरंगी कापड त्या देशातील स्त्रियांना पसंत नसते.
स्वामीजी : त्या ते कापड घेतील किंवा नाही हे मी पाहीन. तू काम करावयाची तयारी ठेव आणि त्या देशात जा. माझ्या ओळखीच्या लोकांच्या नावे मी तुझ्याजवळ परिचयपत्रे देतो. हे कापड सुरुवातीला त्यांनी स्वत:च घ्यावे, अशी मी त्यांना विनंती करीन. मग पाहशील किती लोक त्यांचे अनुकरण करतात ते. मालाच्या मागणीचा पुरवठा करता करता तुझी मुश्कील होऊन जाईल.
शिष्य : भांडवल कुठून आणायचे?
स्वामीजी : सुरुवातीला कसे तरी करून मी तुझे काम सुरू करून देईन. पुढे मात्र तुला आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहावे लागेल. ‘हतो वा प्राप्स्यपि स्र्वग जित्वा वा भोक्ष्यसे महिम्.’ या प्रयत्नात अखेर तू पुरा गारद जरी झालास तरी हरकत नाही.. याउलट यशस्वी जर झालास तर सुखासमाधानाने आयुष्य घालवू शकशील.
शिष्य : ते ठीक आहे, पण  हिंमत होत नाही.
स्वामीजी : म्हणूनच तर मी म्हणतो की, तुमच्यात श्रद्धा नाही बाबा, तुमच्यात आत्मप्रत्ययच नाही मुळी. कसे होईल तुमचे कुणास ठाऊक? ना तुमच्याने होणार संसार, ना साधणार तुम्हाला धर्मकर्म. एक तर मी म्हणतो त्याप्रमाणे उद्योगधंदा करून यशस्वी हो, नाही तर मागे सारे सोडून देऊन आमच्या पावलांवर पाऊल टाकून आमच्या मार्गाने ये, देश-विदेशींच्या लोकांना धर्मोपदेश करून त्यांचे कल्याण कर. असे करशील तरच ना तुला आमच्यासारखी भिक्षा मिळू शकेल? देवाणघेवाण, आदानप्रदान केल्याखेरीज कुणी कुणाकडे ढुंकूनही पाहत नाही. आम्ही धर्माच्या चारदोन गोष्टी सांगतो म्हणून गृहस्थ लोक आम्हाला पोटाला दोन मुठी अन्न देतात हे तर तू पाहतोसच ना? तुम्ही करणारच जर काही नाही तर लोक तरी तुम्हाला फुकट काय म्हणून पोसतील? नोकरी-चाकरीत, त्या गुलामगिरीत इतके दु:ख पाहूनही तुमच्यात काही चेतना उत्पन्न होत नाही! म्हणूनच दु:खकष्टही तुमचा पिच्छा सोडत नाही. हा खरोखर गुणमयी दैवी मायेचाच खेळ म्हटला पाहिजे. त्या देशात जे दुसऱ्यांची चाकरी करतात त्यांचे पार्लमेंटमध्ये बसण्याचे स्थान अगदी मागे असते. ज्यांनी स्वत:च्या प्रयत्नाने, विद्याबुद्धीने वा अन्य प्रकारे नावलौकिक मिळविला असतो त्यांच्यासाठीच समोरच्या जागा राखून ठेविल्या असतात. त्यांच्या देशात जातपातीची भानगडच नसते. उद्यम व परिश्रमामुळे भाग्यलक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न असते तेच देशाचे नेते व नियंते म्हणून मानले जातात. आणि तुमच्या देशात तुम्ही जातीची बढाई करून करूनच अखेर अन्नाला मोताद झाला आहात. एक सुई बनवायची म्हटली तरी अक्कल नाही आणि इंग्रजांवर टीका करायला धावता! त्यांच्या पायाशी बसून जीवनसंग्रामाला उपयुक्त विद्या, कला, विज्ञान, कर्मतत्परता वगैरे गोष्टी शिका. जेव्हा जीवनसंग्रामात लायक ठराल, तेव्हाच कुठे तुम्हाला मानसन्मान मिळेल पुन्हा. मगच तेही तुमचे म्हणणे ऐकून घेतील. कशाचा कशाला कुठे पत्ता नाही- केवळ काँग्रेस स्थापून, आरडाओरड करून काय लाभ होणार ?
शिष्य : पण देशातील सारे शिक्षित लोक तीत भाग घेतात ना?
स्वामीजी : कुणी काही परीक्षा दिल्या वा व्याख्यानांची आतषबाजी केली की झाला तो तुमच्या दृष्टीने शिक्षित! जे शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवनसंग्रामाला लायक होऊ शकत नाही, जे शिक्षण चारित्र्यबल, परसेवा तत्परता व सिंहासारखे साहस निर्माण करू शकत नाही त्याला काय शिक्षण म्हणायचे? ज्या शिक्षणाने माणूस जीवनात आपल्या पायांवर उभा राहू शकतो तेच खरे शिक्षण. जे शिक्षण तुम्ही आज शाळा-कॉलेजांमधून घेता त्यामुळे तुमची एक अजीर्णाचय रोग्यांची जातच जणू तयार होत आहे. किल्ली दिलेल्या एखाद्या यंत्रासारखे तुम्ही राबता, ‘जन्माला आले आणि मरून गेले’ या विधानाचे तुम्ही जणू मूर्तिमंत उदाहरणच आहात. शेतकरी, चांभार, भंगी यांचीदेखील कर्मप्रवणता व आत्मनिष्ठा तुमच्यातील अनेकांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानावी लागेल. अनादिकालापासून ते अगदी चूपचाप काम करीत आले आहेत, देशासाठी तेच धनधान्यांची पैदास करताहेत- पुन्हा कुठे तक्रार नाही की काही नाही. हेच लोक तुम्हाला मागे टाकतील. पैसा, भांडवल त्यांच्या हाती जात आहे व गरजांच्या भाराखाली ते काही तुमच्यासारखे दबलेले नाहीत. सध्याच्या शिक्षणाने तुमची फक्त बाह्य राहणीच बदलली, पण कल्पकता आणि शोधक प्रतिभा यांच्या अभावी तुम्हाला अर्थोत्पादनाचे अन्य उपाय काही गवसत नाहीत. आजपावेतो तुम्ही या सोशिक, दलित जातींना पायदळी तुडविले, पण आता मात्र ते लोक या साऱ्याचा नक्कीच सूड उगवतील. आणि तुम्ही मात्र ‘नोकरी, नोकरी’ करीतच लोप पावाल.
शिष्य : इतर देशांच्या मानाने आमच्यातील कल्पकता जरी कमी पडत असली तरी भारतातील इतर साऱ्या जाती आमच्याच बुद्धिबळावर विसंबून आहेत. अशा स्थितीत ब्राह्मण-कायस्थादी उच्चवर्णीयांना जीवनसंग्रामात पराजित करण्याची क्षमता वा शिक्षण या जातीत कोठून येईल?
स्वामीजी : त्यांनी कदाचित तुमच्यासारखी पुस्तके वाचली नसतील, कोट-पाटलोण घालून ते लोक कदाचित तुमच्यासारखे दिखाऊ सभ्य बनले नसतील हे खरे! पण या साऱ्यांचा वास्तविक उपयोग तरी काय? ते काहीही असो, पण तेच आहेत साऱ्या राष्ट्राचे आधारस्तंभ. सर्वच देशांमध्ये हा प्रकार आढळून येईल. या साऱ्या खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींच्या लोकांनी जर काम बंद केले तर तुम्हाला अन्नवस्त्र तरी कोठून मिळेल?
जीवनसंग्रामात सतत व्यस्त राहिल्याने या लोकांत ज्ञानाचा उदय झाला नाही. मानवी बुद्धीने नियंत्रणाखाली ठेवलेल्या यंत्राप्रमाणे ते सारखे राबत आले आणि बुद्धिमान चतुर लोकांनी त्यांच्या परिश्रमाचे व उपार्जनाचे सार तेवढे आपण लाटले. सर्व देशांमध्ये हेच झाले. पण आता मात्र काळ पालटला आहे. हळूहळू या अन्य जातींना ही गोष्ट उमजत आहे. त्या एकत्र येऊन संघटित रीतीने विरुद्ध उभ्या राहून आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी कटिबद्ध होत आहेत. युरोप-अमेरिकेतील या जातींनी तर जागृत होऊन आधीच लढय़ाला सुरुवात करून दिली आहे. भारतातही या नवजागृतीची चिन्हे दिसू लागली आहेत. या लोकांनी आजकाल पाळलेले हरताळ हेच त्या जागृतीचे प्रमाण. आता कितीही आटापिटा केला तरी उच्चवर्णीय लोक या लोकांना दडपून ठेवू शकणार नाहीत. या लोकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करण्यातच आता उच्चवर्णीयांचे कल्याण आहे.
एवढय़ाचसाठी या सर्वसाधारण जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार करावयास लागा असे माझे सांगणे आहे. त्यांना समजावून सांगा, नीट पटवून द्या की, ‘तुम्ही आमचे भाऊ आहात, आमच्याच शरीराचे अवयव आहात, आमच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे, घृणा नाही. तुमच्या अशा सहानुभूतीने ते शतगुणित उत्साहाने कार्यतत्पर होतील.’
शिष्य : आपण म्हणता ते खरे आहे. पण मला वाटते की उच्चवर्णीय व इतर लोक यांमध्ये अद्यापही फार मोठी खाई आहे. भारतवर्षांतील उच्चवर्णीय लोकांत खालच्या जातीविषयी सहानुभूतीची भावना निर्माण करणे फार कठीण काम आहे.
स्वामीजी : पण असे जर झाले नाही तर तुम्हा उच्चवर्णीय लोकांची काही धडगत नाही. आजपर्यंत आपसात भांडणतंटे, मारामाऱ्या या ज्या भानगडी तुम्ही करीत आलात त्याच करीत राहून तुमचा नाश होईल. हा उच्चवर्णीयेतर बहुजन समाज जेव्हा जागा होईल व तुम्ही त्यावर करता ते अत्याचार जेव्हा त्याला कळू लागतील, तेव्हा त्याच्या भयंकर फूत्कारांनीच तुम्ही कुठल्या कुठे उडून जाल. याच लोकांनी तुमच्यात सभ्यता आणली, तेच परत ती जमीनदोस्त करून टाकतील. एवढी मोठी रोमन सभ्यता, पण गॉल लोकांच्या हाती पडताच कशी मातीस मिळाली. विचार करून पाहा एकदा जरा! म्हणून मी वारंवार सांगतो की या साऱ्या खालच्या जातींना विद्यादान, ज्ञानदान देऊन त्यांना या सुदीर्घ निद्रेतून जागे करण्याचा प्रयत्न करा. ते जेव्हा जागे होतील- आणि एक दिवस ते जागे होणारच यात शंका नाही- तेव्हा तेदेखील तुम्ही केलेले उपकार विसरणार नाहीत, कृतज्ञताच बाळगतील ते तुमच्याबद्दल.

No comments:

Post a Comment