Sunday, December 25, 2011

यशस्वी उद्योजक होण्यासाठी.....

मराठी माणसांना उद्योगधंदा जमत नाही, तो त्यांचा पिंडच नाही, अशा संदर्भातील वाक्यं आपण नेहमीच ऐकतो. आजूबाजूला नजर टाकली तर ते काही प्रमाणात खरं वाटायला लागतं. पुणे, मुंबई आदी महानगरांच्या ठिकाणी लक्षपूर्वक निरीक्षण केल्यास मराठी माणसांना दिलेली दूषणं खरी वाटायला लागतात.  हे असं का घडतं, याचा विचार केला तर याचे समाधानकारक उत्तर सापडत नाही.
मराठमोळ्या व्यक्ती उद्योगधंदा करीत नाहीत, अशातला भाग नाही. उद्योगधंद्यामध्ये देश-विदेशात आपली मोहोर उमटवणारे अनेकजण आहेत. मात्र दुर्दैवाने अशांची संख्या तुटपुंजी आहे. मराठी माणसे उद्योगापेक्षा नोकरी करण्यालाच अधिक पसंती देतात.उद्योजक होण्यासाठी नेमके काय लागते, याचा विचार करताना उद्योगासाठी लागणारे भांडवल, उद्योगाचे तंत्र आदी पुरवणारे आणि शिकवणारे अनेक आहेत. परंतु उद्योग व्यवसाय बंद पडण्याची कारणे आणि झालेल्या चुका याचे विश्लेषण करणारे अभावानेच आढळतात. असाच एक घडलेला किस्सा सांगतो! नवरात्रीचे दिवस असल्यामुळे उपवासाचे शेंगदाणे आणण्यासाठी दुकानात गेलो. अर्धा किलो शेंगदाणे हवेत, असे सांगितल्याबरोबर दुकानदाराच्या डोक्यावर आठय़ा पडल्या. आता २०० ग्रॅम देतो, बाकीचे उद्या घेऊन जा साहेब. दुकान नेहमीचे असल्यामुळे माझा होकार त्याला अपेक्षित होता. तेवढय़ात अगदी लागून असलेल्या दुकानातील १२-१४ वय असलेल्या मुलाने शेंगदाण्यांनी भरलेली ओंजळ पुढे केली. साहेब, उपवास का शिंगदाणा खाकर देखिये. मी एक शेंगदाणा उचलला आणि तोंडात टाकला आणि बाकीका ३०० ग्रॅम तू दे दे, म्हणत त्याला ऑर्डर देऊन टाकली. हा घडलेला किस्सा तसा ३०-४० रुपयांचा वाटत असला तरी बरंच काही शिकवून गेला. एकतर दुकानदाराच्या कपाळावर स्पर्धेमुळे आठय़ा पडल्या होत्या, हे कारण मला मिळालं आणि समोर असलेल्या संधीचं प्राप्तीत रूपांतर करण्याचं कसब हे त्या लहान मुलाने दाखवून दिलं होतं. नेमकं हेच संवादकौशल्य आणि मितभाषीपणा उद्योजकाकडे असणं खूप आवश्यक आहे. विक्री आणि प्रशासकीय कौशल्य तुम्ही अंगिकारलं तर यशप्राप्तीचा पहिला गड तुम्ही सर केलाच, म्हणून समजा.
मितभाषीपणा आणि सेवा तत्परता, कुठल्याही व्यवसायाला अधिकचा गुण मिळवून देतात. दुसरी गोष्ट उद्योगामध्ये नावीन्य आणलेच पाहिजे. तंत्रज्ञानाच्या ओघात जर तुम्ही स्वत:ला विकसित केले नाही तर गटांगळ्या खाण्याची सुरुवात झालीच म्हणून समजा.
पूर्वी कापडी बॅनर रंगविणारे अतिकुशल कामगार आम्ही मुंबईमध्ये पाहायचो. अतिकुशल यासाठी म्हटलं की, त्यांच्या हातातला ब्रश कॅनव्हासवर ज्या वेगाने आणि सफाईने फिरायचा. वाह क्या बात है! पण डिजिटल फ्लेक्सच्या काळात त्यांची अवस्था दयनीय झाली. पण यापैकी काहीजणांनी जाणीवपूर्वक नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे अजूनही ते या व्यवसायात टिकून आहेत.
तोच प्रकार सायबर कॅफे चालविणाऱ्यांचा. हल्ली घरोघरी संगणक येऊ लागल्यामुळे आणि इंटरनेट सेवा दूरध्वनीद्वारे अथवा मोबाइलवरून उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली. परिणामी अनेक सायबर कॅफे तोटय़ात जाऊ लागले. असा वेळी त्या सायबर कॅफेच्या जागी इतर काही उदा. संगणक प्रशिक्षण केंद्र वगैरे सुरू करणं शक्य असतं. मात्र असा बदल करण्याचा विचारही ते करत नाहीत. कारण बदल म्हणजे जोखीम असेच त्यांना वाटत असते.
कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमेलच अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. त्यातच जर वाचून आणि भाषणे ऐकून व्यवसाय करता आला असता तर आपल्याकडील बेरोजगारांची यादी बरीच कमी झाली असती. व्यवसाय हे कृतीप्रधान क्षेत्र असल्यामुळे प्रत्यक्ष कृतीशिवाय यश जवळपसही फिरकत नाही.
मुळात व्यवसाय हा बंद करण्यासाठी सुरू केलेला नसतो; परंतु नफ्या-तोटय़ाचा ताळमेळ अंगाशी येऊ लागला की, व्यवसाय बंद पडण्याच्या अवस्थेत येतो. अशा वेळेस फ्रँचाइझीचा विचार करता येईल.
फ्रँचाइझी प्रणाली म्हणजे काय तर फ्रँचाइझी प्रणाली उद्योगामध्ये निर्णय क्षमतेच्या चुकीमुळे होणारा घातकी धोका टाळते. घातकी धोका यासाठी म्हटलं की, उद्योग व्यवसाय म्हटलं की नफा-तोटा हा ठरलेलाच, पण याउलट घातकी धोका म्हणजे नफा शून्य, पण तोटा दुप्पट-चौपट वेगाने वाढत जातो. नेमका हा धोका ओळखण्याचं आणि टाळण्याचं काम या प्रणालीद्वारे केलं जातं. त्यासाठी एक ठरावीक रक्कम फ्रँचाइझीला द्यावी लागते.
या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वत: व्यावसायिक म्हणून कृतिशील असता. तुम्हाला कृतिशील ठेवून व्यवसाय सुरू करून वाढवण्याचं कसब, अद्ययावत तंत्रज्ञांसोबत सांगड घालण्याचं कसब, जाहिरात कला, कार्यालयीन व्यवस्थापन, दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, ग्राहक सेवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करण्यात येणारे डावपेच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रँचायझरची विश्वसनीयता. हे सर्व फ्रँचायझरद्वारे पुरवलं जातं.
जागतिकीकरणामुळे कित्येक व्यवसाय उद्योग करण्यासारखे आहेत. गरज आहे ती फक्त डोळसपणे ते निवडण्याची. आपल्याकडे मोठी बाजारपेठ असताना अचूक संधी साधता येणे अत्यावश्यक ठरते.

No comments:

Post a Comment