Showing posts with label Dependent. Show all posts
Showing posts with label Dependent. Show all posts

Tuesday, February 10, 2015

गृहीत का धरता ?

 एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचे लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं होतं आणि समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं. अन्यथा मित्राने अडचणीच्या वेळी केलेली पैशांची मदत असो की शेजाऱ्यांकडे विश्वासाने ठेवायला दिलेली आपल्या घराची चावी असो अशा गृहीत धरण्यावरच तर आपलीं नाती समृद्ध होत असतात.
'आ जोबांचे वय 'क्ष' वर्षे, आणि समीरच्या गाडीचा वेग 'य' किलोमीटर तासाला.' असे गृहीत धरून गणित सोडविताना बाईंनी दोन समीकरणे फळ्यावर लिहिली. पटापट सोडवली. 'क्ष' आणि 'य' च्या किमती बरोबर काढून गणित सुटले, उत्तर बरोबर. गुण मिळाले पैकीच्यापैकी. असेच 'क्ष, य' गृहीत धरून आयुष्याचे गणित सुटले तर? तिथे गृहीत धरणे आहे, पण गणित सुटेल याची खात्री शून्य. असं अनेकदा होताना दिसतं. नातं कुठलंही असो, एकजण दुसऱ्याला गृहीत धरतो. त्याच्याजवळ आदर, माया,  दखल, किमान केलेल्याची जाणीव, दोन शब्दांचा उच्चार,  कौतुक काही काही नसतं. असतं ते फक्त गृहीत धरणं!
अगदी साध्या साध्या गोष्टींत अनेक जण दुसऱ्याला गृहीत धरतात. रवीला दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचायला लागायचं. पण रोज सकाळी कोण बाहेर जाणार त्यासाठी? त्याने सरळ सकाळी फिरायला जाणाऱ्या शेजारच्या आजोबांना विचारलं आणि त्यांनीही ते सहज मान्य केलं. त्या दिवसापासून आजोबा नित्यनेमाने रवीसाठीही वृत्तपत्र आणू लागले. एकदा सकाळीच आजोबांना ओळखीचे गृहस्थ भेटले आणि बोलता बोलता उशीर झाला. इकडे रवी अस्वस्थ झाला. रोजची सवय पडलेली. चिडचिड व्हायला लागली. तशातच तो ऑफिसला निघाला. गाडी बाहेर काढत असताना आजोबा दिसले. मागचा पुढचा विचार न करता रवी चिडून मोठय़ांदा म्हणाला, ''किती उशीर? मला ऑफिसला निघायचं असतं पेपर वाचून, माहीत नाही का?'' आजोबा क्षणभर शांत राहिले. मग ''इतके दिवस आठवणीने आणि वेळेत आणत होतो ना पेपर. एखाद् दिवस होऊ शकतो उशीर. तू आता हे जे काही म्हणालास ते म्हणजे मी तो तुझ्या वेळेतच आणला पाहिजे हे तू गृहीत धरलंस. मला तुझ्या ऑफिस वेळेची कशी कल्पना असणार. त्यामुळे यापुढे मी कधीही वर्तमानपत्र आणणार नाही.'' असं म्हणत ते पेपरसह वरती निघून गेले.
             खरं तर नात्यांपलीकडेही आपण अनेक गोष्टी गृहीत धरत असतो. सूर्याने प्रकाश द्यायला हवा, मेघांनी पाऊस पाडायलाच हवा, घडय़ाळाने योग्य वेळ दाखवायलाच हवी, हृदयाने टिकटिक करायला हवी, पण जेव्हा हे सगळं विरुद्ध होतं तेव्हा आपल्याला त्या त्या गोष्टीची किंमत कळते. म्हणूनच आपण एखाद्या गोष्टीला वा व्यक्तीला फार गृहीत धरत नाही ना हे पाहायला हवं.  एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचं लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं.
             बहुसंख्य ऑफिसमध्ये असा एखादा 'नारायण' असतोच. ज्याला अनेक जण अगदी बॉसपासून चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यापर्यंत अनेक जण गृहीत धरतात. परंतु काही वेळा त्याची श्रीसारखी अवस्था होते. श्रीला सगळेच गृहीत धरायचे. त्यामुळे सगळे जण आपलं काम त्याच्यावर सोपवून चक्क सिगरेटी फुंकायला बाहेर पडायचे. इतकंच नाही तर महिला वर्गही आपले अर्धवट काम त्याच्यावर सोपवून गाडी पकडायला धावायच्या. आणि श्री मात्र रात्र रात्र थांबून ते काम पूर्ण करायचा. नव्याने रुजू झालेल्या संयुक्ताच्या हे लक्षात आलं.  तिला श्रीचा साधेपणा भावला, पण लोक गृहीत धरून घेत असलेला त्याचा फायदा तिला खटकायला लागला. काही महिने गेल्यावर मात्र तिने हळूहळू त्याच्या हे पचनी पाडायला सुरुवात केली. ''मदत करायला हरकत नाही. करच तू. जे अडतील, ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी पुढाकार नक्की घे, परंतु लोकांनी तुला गृहीत धरणं योग्य नाही. आणि इतकं करून कोणी कौतुकही किंवा आदर तरी देतं  का उलट 'ते काम करून ठेव रे, असे आदेश ते कसे काय देऊ शकतात? तू कुणाचाही नोकर नाहीस. प्रत्येकाला आपापल्या कामाचा पगार मिळतो. त्यामुळे एखादा दिवस ठीक आहे, पण  दरवेळी वर्षांमॅडमची बॅलन्सशीट तूच का टॅली करून द्यायची?''
श्रीला संयुक्ताचं म्हणणं पटत होतं. तो म्हणाला, ''पण नाही कसं म्हणणार?''
                 ''तोंडाने. अगदी थेट. तुझा आत्मसन्मान हा तुझा आहे. तो टिकवणं हे फक्त तुझ्या हातात आहे. कोणी गृहीत का धरावं तुला? तू प्रेमाने सगळ्यांचं करतो म्हणून? आणि इतकं करून काल तू एक शंका विचारायला गेलास माधवीला तर कसं उडवून टाकलं तिने तुला? हे वाईट.  तू हुशार आहेस. थोडासा स्मार्ट हो. तू काहीही बोलणार नाही हे गृहीत धरून लोक तुझ्याशी कसंही वागतात, ते तू चालवून घेऊ नकोस. तुझ्याच लक्षात येईल. त्यांच्या नजरेत तू खूप खूप वर असशील.''
               श्रीला संयुक्ताचं म्हणणं थेट भिडलं. रात्रभर तो विचार करत राहिला. आपणच आपल्याला गृहीत धरणं थांबवू शकतो हे त्याला मनोमन पटलं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला तो काही निर्णय घेऊनच. वर्षांबाईंनी नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट त्याच्या टेबलवर सरकवली. तसं शांतपणे हसत तो त्यांना म्हणाला, ''फॉर अ चेंज वर्षां मॅडम, या महिन्यात बॅलन्स शीटचं काम तुम्हीच केलंत तर?''                 

Monday, May 27, 2013

संघर्ष, स्वत:चा स्वतशी ............





                        संघर्ष, स्वत:चा स्वतशी

 

            जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही गरजेचं आहे. यासाठी माणसालाही संघर्ष करावाला लागतो स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..
          सुरवंटाचं फुलपाखरू होण्यापर्यंतची प्रक्रिया फारच जीवघेणी असते. एका अत्यंत कुरूप किडय़ाचं देखण्या फुलपाखरात रूपांतर होणार असतं, त्यासाठी त्याला करावा लागतो जीवघेणा संघर्ष, स्वत:च स्वत:शी केलेला. एकटय़ाने..
          असाच एक फुलपाखरू, धडपडत होता कोषातून बाहेर यायला. त्यापूर्वीचा  सुरवंटाचा संघर्ष आता संपला होता. प्रचंड कष्टाने त्याने स्वत:भोवती कोष विणून स्वत:लाच घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. आता प्रतीक्षा होती कोषातून बाहेर यायची. फुलपाखरू बनण्याचा क्षण आता काही मिनिटांच्या अंतरावर वाट पाहत अधीर झालेला. त्याचं कोषातून बाहेर पडणं निश्चित होतं. कोष फाडून तो किंचित बाहेरही आला. तारेसारख्या पायाचं स्वत:ला उभं करण्यासाठी धडपडणं सुरू होतं..
             हे सगळं एक माणूस बघत होता. थोडा जरा जास्तच संवेदनशील होता तो. बुद्धीपेक्षा मनाने विचार करणारा. फुलपाखराची ती धडपड त्याला अस्वस्थ करू लागली. मी याला मदत करू शकतो का? त्याने स्वत:लाच प्रश्न केला. तेवढय़ात बराच वेळ धडपडणारा तो कोष अचानक स्तब्ध झाला.. काही काळ. आता मात्र काहीतरी करायला हवं, त्याच्या हळव्या मनानं सांगितलं. तो कात्री घेऊन आला. आणि त्याने हलक्या हाताने कोषाचा तो पातळ पापुद्रा कापून विभक्त केला. तो वाट पाहत राहिला.. आता फुलपाखराला सहज बाहेर पडता येईल.. आपले रंगीबेरंगी पंख पसरून तो हवेत मस्त विहरेल.. पण तसं काहीच घडलं नाही. त्याचं अंग सुजू लागलं आणि पंख कोरडे पडू लागले. पंख मोकळे होण्याएवजी अर्धवट मिटलेलेच राहिले.. आता ते कधीच फुलू शकणार नव्हतं. फुलपाखरू कायमचं अपंग झालं होतं.. त्या माणसाला हे कळलं की आपण दाखवत असलेली दया त्या फुलपाखराला कायमची अपंग बनवून टाकणारी ठरलीय, पण खूप उशीर झाला होता. कोषातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी संघर्ष करणं ही फुलपाखरावर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी होती. त्यासाठी होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारं द्रव्यच त्याला कोषापासून विलग करण्यास मदत करणारं होतं, परंतु त्या माणसाच्या दयेमुळे ना संघर्ष उरला होता, ना त्यातून मिळणारा स्वत:ला सिद्ध करण्याचा आनंद. आता उरलं ते फक्त केविलवाणं जगणं. फुलण्याशिवायचं, विहरण्याशिवायचं!
             आपलंही आयुष्य असंच असतं. पुढे जाण्यासाठी, स्वप्नांमागे धावण्यासाठी संघर्ष गरजेचाच असतो. आणि तो आपला आपणच करायचा असतो. तरच सोन्यासारखं तावूनसलाखून लखलखीतपणे बाहेर पडता येतं. आपल्याला कुणीतरी फक्त घास भरवू शकतो. पण तो घास चावायचा मात्र आपल्यालाच असतो. दुसऱ्याच्या कुबडय़ा आपल्याला फक्त अपंगत्वच देतात. उठून उभं राहायची ताकद आपली आपणच मिळवायची असते. त्यासाठी संघर्ष महत्त्वाचा.. तो आपल्याला घडवत असतो. आपल्यातल्या सुरवंटाचं फुलपाखरू घडवत असतो..
              खूप काही घडवण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा, तसं खूप काही टाकून देणंही. ते सोपं नसतंही अनेकदा, पण आयुष्य पुढे न्यायचं असेल तर प्रयत्न करणं अपरिहार्य असतं.
              आपल्याही आयुष्यात असे जुने काही असतेच. कटू आठवणी, जीवघेणे अनुभव, अपयशाचं ओझं. जोपर्यंत ते आपण टाकत नाही. नव्या अनुभवासाठी स्वत:मध्ये नवी जान भरत नाही, तोपर्यंत नवं आयुष्यही आपल्याला कवेत घ्यायला उत्सुक नसतं. भूतकाळ बरोबर घ्यायचा नसतोच. नाही तर वर्तमानाला जागाच उरत नाही. आणि मग उज्ज्वल भविष्याला तर नाहीच नाही.. 
              जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही. यासाठी माणसालाही संघर्ष करावा लागतो..  स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..



*@*   स्वप्नील  वाघमारे   *@*

Saturday, March 17, 2012




आपल्याला खरच आधाराची गरज आहे का ???????

आज अजून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटतेय.


एकदा एक बलाढ्य मोठा राजा आपल्या राज्यात फेरफटका मारत असतो , तिथे त्याला एक पक्षी विकणारा दिसतो . त्या पक्षी विकणाऱ्याकडे राजाला दोन अतिशय सुंदर , लोभस,मनमोहक असे पक्षी दिसतात . राजाला ते खूप आवडतात, राजा त्या दोन्ही पक्ष्याचे योग्य ती किमत त्या पक्षी विकणार्याला देऊन त्यांना आपल्या मोठ्या राजवाड्यात आणतो. ते दोन्ही पक्षी राजा आपल्या मोठ्या बगिच्याच्या मध्यभागी ठेवतो.
             काही दिवस राजा स्वताहा त्या दोन्ही पक्ष्यांना जेवण आणि पाणी भरवत असे. त्याला त्या पक्ष्यांबद्दल खूप प्रेम वाटत असे. असा करता करता राजा रोजच्या दिवसातले काही तास त्या पक्ष्यासोबत घालवत असे. एके दिवशी राजाला असे वाटला कि आपण विनाकारण त्या पक्ष्यांना आपल्या प्रेमाच्या कैदेद ठेवले आहे, मग त्याने ठरवले कि आपण यांना त्यांच्या पिंजर्यातून मुक्त केले पाहिजे . राजाने मनात विचार पक्का केला आणि राजाने त्यांना त्यांच्या पिंजऱ्या मधून मुक्त केले.
            दोन्ही पक्ष्या मधला पहिला पक्षी  आपल्या  मुक्तापानाचा आनंद घेत एकदम उंच  उंच उडू लागला. सगळी कडे तो फेरी मारू लागला , या टोकाकडून त्या टोकाकडे तो उंच उंच भरारी घेत आपल्या आनंदात फिरू लागला. कधी या फांदीवर तर कधी त्या फांदीवर ,कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर नुसताच तो आपल्या आनंदात फिरू लागला. राजाला त्या पक्ष्याकडे बघून खूप आनंद झाला , राजाला वाटले कि मी विनाकारण त्या दोन्ही पक्ष्यांना आपल्या पिंजर्यात बांधून ठेवले. थोड्या वेळाने राजाचे लक्ष्य त्या दुसर्या पक्ष्याकडे गेले. तो पक्षी जवळच्याच झाडावर जाऊन एका फांदीवर बसला.
            राजाला वाटले कि आपण त्या पक्ष्याचा घात केला , एका चांगल्या पक्ष्याला उडण्यापासून मी वंचित ठेवले. राजाला वाटले कि त्या पक्ष्याने पण पहिल्या पक्ष्या सारखे उंच भरारी घ्यावी , पण काही केल्या तो पक्षी जागेवरून हललाच नाही.दुसऱ्या पक्ष्याने पण उडाव असे राजाला वाटू लागला. राजाने त्याला उडवण्यासाठी  प्रयत्न चालू केले , पण काही केल्या तो पक्षी काही उडतच नव्हता. राजाला थोडा राग आला पण राग न करता तो पक्षी का उडत नाही याची काळजी राजाला वाटू लागली.
              राजाने गावात दवंडी पिटवली कि जो कोणी त्या पक्ष्याला उडवून देईल त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल. बक्षिसाच्या लालसे पोटी बऱ्याच लोकांनी भरपूर प्रयत्न केले पण सगळ्यांना निराशाच हाती लागली . तो पक्षी काही केल्या उडण्यास तयार नव्हता . राजाला खूप वाईट वाटले , राजाने परत बक्षिसाची रक्कम वाढवली . परत नवीन नवीन लोकांनी त्या पक्ष्याला उडवण्यासाठी प्रयत्न चालू केले . कोणालाही यश संपादन झाले नाही , त्या पक्ष्याने काही ती फांदी सोडलीच नाही . काही जादुगारणी लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पण सगळेच अपयशी ठरले.मग  तांत्रिक मांत्रिक या लोकांनी पण आपल्या प्रयत्नाची पराकाष्टा लावली , तरीही कोणालाही यश संपादन झाले नाही. तो पक्षी आपली फांदी काही केल्या सोडत नसे. राजाची चिंता अजून वाढू लागली होती. राजाने ज्या पारध्याने ते दोन पक्षी पकडले होते त्या पारध्याला सुद्धा पक्ष्यांना उडवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले , तो पारधीही अपयशी ठरला. ते पाहून राजा दिवसभर चिंतातूर राहू लागला , राजाचा अस्वस्थपणा वाढू लागला.
            कोणीतरी राजाला सांगितले कि दुसऱ्या राज्यातून कोणी माणूस आला आहे, आपण  त्याला प्रयत्न करण्यास सांगू या. राजाने लगेचच दोन लोकांना पाठवून त्या परदेशी माणसाला बोलवणे पाठविले. राजाने त्याला सगळी हकीकत सांगितली. तो माणूस राजाची परवानगी घेऊन त्या पक्ष्याकडे आला. थोड्याच वेळात तो पक्षी या फांदी वरून त्या फांदीवर फिरू लागला. त्या पक्ष्याने संपूर्ण बगीच्याचा ताबा घेतल्यासारखा तो सगळी कडे भरारी घेऊ लागला.
          राजाने त्या पक्ष्याला बगिच्यामध्ये उंच भरारी घेताना बघितले आणि राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो लगेच बगिच्या मध्ये आला आणि त्या पक्ष्याच्या उडण्याचा आनद घेऊ लागला. राजाने त्या पर- प्रांतीय माणसाला भरगोस बक्षीस दिले. आणि त्याला विचारले कि तू त्याला कसे काय उडवले.
        त्या पर प्रांतीय माणसाने एकदम अदबीने राजाला कुर्निसात करत सांगितले कि मी फक्त त्याचा आधार काढून घेतला आणि त्याने स्वताच आपल्याला असलेल्या पंखांचा वापर करून भरारी घेतली , म्हणजे तो पक्षी ज्या फांदीवर उभा होता ती फांदी मी कापून टाकली ,ज्या फांदीवर त्याने ईतके दिवस आधार घेतला होता तीच फांदी आता नसल्यामुळे त्याला उडण्याशिवाय पर्यायाच नव्हता.
          जेव्हा आपल्याकडे काहीच आधार नसतो तेव्हा आपण आपली खरी ताकत ओळखतो. बऱ्याच वेळा आपल्याला कोणची न कोणाची आधाराची गरच असते , पण जेव्हा आपल्याला आपल्याकडील खऱ्या शक्तीची ओळख होते तेव्हा आपल्याला कोणाच्याही आधाराची गरज उरत नाही,आपण आपले जीवन सुंदर बनवत जातो. आपले जग हे आपणच सुंदर बनवावे तेही कोणाचे हि आधार न घेता .कधीही कोणावरही अवलंबून राहू नये. कधी हि कोणीही कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नये किवा कोणाचाही आधारवर जगण्याची सवय लाऊ नये.



@#@#  स्वप्नील वाघमारे  @#@#