कम्फर्ट झोन
आपल्या मनातले कम्फर्ट झोन आपल्याला थांबवतात की वाढवतात, ते पाहायला
शिकणं महत्त्वाचं. एकदा कम्फर्ट झोन म्हणजे काय, आणि त्यात अडकल्यानं किंवा
बाहेर पडल्यानं काय होतं, ते समजून घेतलं की कम्फर्ट झोन आपल्याला त्याचा
आनंद घेत वाढायला शिकवतो. तसंच दमछाक झाली तर कुठे थांबायला हवं, तेही
शिकवतो..
एका लाकडाच्या वखारीत कामातल्या कौशल्याची परीक्षा घेऊन कारागीर
निवडण्याची पद्धत असते. एका उमेदवाराचं काम मालकाला फारच आवडतं. त्याचा
लाकडं तोडण्याचा वेग इतरांच्या तिप्पट असतो आणि कामही सुबक. अर्थातच त्याचा
पगारही इतरांपेक्षा जास्त ठरवला जातो. एकदा परीक्षेत पात्रता सिद्ध
केल्यावर तो कारागीर काही दिवस आपल्याच नादात वेगानं काम करत राहतो. त्याचा
कामाचा आवाका पाहून मालक खूश असतो. तर इतर कारागिरांना त्याची धास्ती
वाटते. त्याच्यामुळे स्वत:चा वेग वाढवण्याचे विविध मार्ग इतरांना शोधावे
लागत.
कालांतरानं मालकाच्या लक्षात येतं, की इतरांच्या कामाचा वेग वाढलाय, पण
या कारागिराचा वेग एवढा कमी झालाय की, त्याचा पगार देणं परवडत नाहीये.
शिवाय पूर्वीपेक्षा कमी काम करूनही तो जास्त थकतोय, कंटाळतोय. या बदलाचं
कारण शोधण्यासाठी मालक त्याच्यावर नजर ठेवतो. तो पूर्वीसारखाच वक्तशीर
असतो. नेहमीचं काम इमानेइतबारे करत असतो, पण नवीन यंत्रसामग्रीची तो
माहितीही करून घेत नाही किंवा आपल्या जुन्या हत्यारांना धारही लावत नाही.
हे लक्षात आल्यावर मालक कारागिराला तसं विचारतो.
कारागीर म्हणतो, ''साहेब, काय करू? कामाच्या ओघामुळे हत्यारांना धार
करायलाही वेळ मिळत नाही, तर नवीन कुठलं शिकायला? बोथट हत्यारांमुळे काम कमी
आणि कष्ट जास्त होत आहेत.''
मालक निर्वाणीनं सांगतो, ''अरे, याच कामाच्या ताणात इतरांनी एकमेकांच्या
मदतीनं नवंनवं शिकून स्वत:त सुधारणा केली. तू मात्र एकदा स्वत:ला सिद्ध
केल्यावर पुढे सरकलाच नाहीस. तुझी जुनी हत्यारं लवकरच मागे पडतील. हातातलं
कसब संपलं तर तुला कायमची रजा देणं मला भाग पडेल.''
कसबी कारागिराची ही कथा कामातलं समाधान, स्वविकसन, अपेक्षा, उत्पादकता
अशा बऱ्याच विषयांना स्पर्श करते. स्वत:ची क्षमता मनासारखी सिद्ध होईपर्यंत
सर्वजण प्रयत्न करत असतात. पात्रता चाचणीत उत्तीर्ण होऊन जगासमोर आणि
स्वत:समोर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर काही र्वष जातात. नवखेपणा कमी होतो.
अनुभवासोबत आत्मविश्वासही वाढतो. कामाची नाडी बरोबर सापडते. सवय झाल्यामुळे
कामाचा ताण येत नाही, खूप ऊर्जा लावण्याची गरजही पडत नाही. न्यूटनच्या
पहिल्या नियमाप्रमाणे आता शेवटपर्यंत हे असंच शांतपणे चालत राहणार आहे, असं
आपण गृहीत धरतो.
विनाधडपड, विनाताण सहजपणे काम करता येणं हा 'कम्फर्ट झोन' टप्पा असतो.
चढण चढल्यानंतर आलेल्या डोंगरावरच्या माचीसारखा. पहिला उत्साह थोडा शिथिल
पडलेला असतो. स्वत:ला जगासमोर सिद्ध करण्याची अत्यावश्यकता संपलेली असते.
या ठहरावाला आपण माची समजतो की, घाटमाथा यावर खूप गोष्टी ठरतात. माची वाटत
असेल तर थोडा दम खाऊन तरतरीत होऊन आपण पुढे निघतो. घाटमाथा वाटत असेल तर
तिथेच थांबतो. या टप्प्यावर आपला 'अॅप्रोच' महत्त्वाचा ठरतो.
करिअरकडे पाहण्याचा आपला अॅप्रोच ठरतो, तो 'यश' या शब्दाच्या आपल्या
व्याख्येनुसार. आपलं मन कशाला 'यशस्वी' होणं समजतं, याचं भान जोखता आलं तर
स्पष्टता घेऊन पुढे जाता येतं. या टप्प्यावर माणसं साधारणत: तीन प्रकारांनी
वागताना दिसतात-
पहिला प्रकार असतो तो 'सुखी' माणसांचा. ही माणसं युरोप टूरला गेली तरी
'लंडनमध्ये मस्त पुरणपोळीचं जेवण मिळालं आणि दुपारी निवांत झोप मिळाली. टूर
फारच भारी झाली,' असं सांगतात. त्यांची यश आणि सुखाची कल्पना तेवढीच असते.
त्यांना स्वत:चा असा कुठलाच विशिष्ट रंग नसतो. एका छोटय़ाशा 'कम्फर्ट
झोन'मध्ये ती आयुष्यभर सुखाने राहतात, स्वत:वर खूश असतात. तोच खेळ पुन्हा
पुन्हा त्याच उत्साहानं खेळत राहातात. अशांचं प्रमाणही बरंच असतं.
दुसरा प्रकार आपल्या गोष्टीतल्या कारागिराचा. अशांची संख्या सर्वात
जास्त असते. त्यांच्यात क्षमता असते, पण 'कम्फर्ट झोन'ला पोहोचल्यावर
त्यांच्यात जडत्त्व येतं. आणखी पुढे जाण्यासाठी जे थोडेफार कष्ट घ्यावे
लागतात, त्याचा त्यांना आळस यायला लागतो. 'खरं आहे, पण वेळच मिळत नाही,' हे
यांचे लाडके शब्द. कधी कधी अपवादात्मक परिस्थिती माणसाला काही काळ जखडून
टाकते हे खरं, पण बहुतेकदा 'वेळ नाही' ही यांची सबब लंगडीच असते.
कॉम्प्युटरसारखी नवीन टेक्नॉलॉजी शिकणं, डिपार्टमेंटच्या प्रमोशनच्या
परीक्षा देणं, हे लोक टाळतात. एवढंच कशाला, नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी
जबाबदारी घ्यायलाही ते नाखूष असतात. 'वेळ नाही' च्या सबबीत काही दम नाही,
हे त्यांनाही मनातून कुठेतरी माहीत असतं. म्हणून तर स्वत:च्या 'कम्फर्ट
झोन'मध्ये ते खूप कष्ट करतात. तिथे पर्फेक्शनिस्टही असतात. मात्र
विचारांच्या आणि कृतींच्या त्याच त्या चक्रात फिरत राहतात. 'तेच ते तेच ते,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत' यामुळे येणाऱ्या साचलेपणापेक्षा,
कंटाळ्यापेक्षासुद्धा त्यांना जास्त भीती वाटते ती पुन्हा पुन्हा स्वत:ला
सिद्ध करण्याची. नवीन कौशल्य शिकायला गेलो आणि जुन्या कौशल्याएवढी उत्तमपणे
हे करता आलं नाही तर? त्यापेक्षा झाकली मूठ बरी. अशा काहीतरी
स्पष्ट-अस्पष्ट विचारांतून ते नव्याला टाळत राहतात. मात्र थेट नकाराऐवजी,
'वेळ कुठेय?', 'आता काय वय राहिलंय का?', 'ही पुरुषांची / स्त्रियांची
कामं' अशा सबबी शोधतात. एक नोकरी सोडून दुसरीत शिरण्याचा विषय असेल तर
त्यात जोडीला असुरक्षिततेचीही भीती असते. मात्र या आळस किंवा भीतीकडे
बघायचंसुद्धा टाळून अनेकदा हे लोक अनेक सबबी देत स्वत:लाच फसवत असतात.
तिसऱ्या सर्वात छोटय़ा गटातल्या लोकांना माहीत असतं की, हा आलेला टप्पा
माचीचाच आहे. अजून कित्येक माच्या असतील, वाटलं तर या डोंगरावरून पुढच्या
दुसऱ्या डोंगरावरही जाता येऊ शकतं. चढण्याची क्षमता महत्त्वाची. त्यांची
यशाची कल्पना थोडी वेगळी असते. आयुष्यभर एकाच चक्रात फिरायचा त्यांना
कंटाळा येतो. त्यांची स्पर्धा स्वत:शीच असते. स्वत:पाशी सिद्ध होणं
त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. त्यातून त्यांचं जगापुढे सिद्ध होणं
आपोआप घडत जातं. या व्यक्ती स्वत:त सतत भर घालत असतात. त्यामुळे काळाबरोबर
राहातात, ते बिझी असतात, पण तरीही त्यांना नव्या गोष्टी शिकण्यासाठी वेळ
काढता येतो. आपण एखाद्या 'कम्फर्ट झोन'मध्ये अडकतोय, असं जाणवलं की, ते
अस्वस्थ होतात. त्यातून बाहेर पडून नवा 'कम्फर्ट झोन' निर्माण करायला
त्यांना आवडतं.
''आपण आज आहोत त्या परिस्थितीत समाधानी राहात गेलो तर उद्या यापेक्षा
चांगला असण्याची शक्यताच संपते,'' अशा अर्थाचं एडिसनचं एक प्रसिद्ध वाक्य
आहे. या तिसऱ्या प्रकारच्या लोकांना ते तंतोतंत लागू पडतं.
या तीनही प्रकारच्या लोकांमध्ये काही गोष्टी चांगल्या तर काही
त्रासदायक असतात. अत्यंत स्थितिशील लोकांच्या आयुष्यात आणखी ४० वर्षांनीही
फारसा बदल घडत नाही, पण तरी ते समाधानी असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक
त्यांच्या 'कम्फर्ट झोन'च्या विशिष्ट कामांमध्ये राजे असतात. मात्र बदलाला
स्वीकारणं राहू दे, ओळखणंही नाकारतात. त्यामुळे मोठा बदल येतो तेव्हा ते
सामोरं जाणं टाळतात. त्यातून पुढे वैफल्य येऊ शकतं. तिसऱ्या प्रकारच्या
लोकांमुळे जगात बदल घडतात, पण नंतर त्यांना फक्त चढण्यासाठी चढत राहण्याची
सवय लागू शकते. त्यांना कायम घाई असते, स्थर्य स्वीकारता येत नाही. दमले
तरीही थांबणं त्यांना अपराधी वाटतं. मग या सर्वामधला कुठला प्रकार चांगला
समजायचा? कोणता रस्ता निवडायचा?
खरं तर चांगलं-वाईट या संकल्पनाही सापेक्ष असतात. त्यामुळे चूक-बरोबर,
चांगल्या-वाईटाचा निवाडा करण्यापेक्षा आपल्या मनातले कम्फर्ट झोन आपल्याला
थांबवतात की, वाढवतात ते पाहायला शिकणं महत्त्वाचं. कम्फर्ट झोन करिअरसह
आपल्या इतर वैयक्तिक गोष्टींबाबतही असतात. विविध टप्प्यांवर स्वत:ला
प्रामाणिकपणे प्रश्न विचारून तपासत राहणं योग्य उत्तरापर्यंत नेतं. स्वत:चा
कम्फर्ट झोन, आळस, भीती यांच्याकडे त्रयस्थपणे पाहायला असे प्रश्न मदत
करतात. नेहमीच्या परिस्थितीत अचानक आलेला बदल स्वीकारायला आपल्या मनाची
किती तयारी आहे? कुठल्या जुन्या सवयी सोडणं किंवा नवीन लावून घेणं आपल्याला
जमेल/ जमणार नाही? ते यातून स्पष्ट होत जातं आणि कुठल्या परिस्थितीत
शिरायला आपण नाखूश असतो, तेही समजतं. उदा. एकटय़ाने लांबच्या प्रवासाला जाणं
मला जमेल/आवडेल का? आत्ताच्या आत्ता पॅराग्लायिडग करण्याची माझी तयारी आहे
का? चारचौघांत / सभेत / रेडिओ-टीव्हीवर माझे मत मांडू शकेन, असे मला वाटते
का? नावडती नोकरी मी सोडू शकेन का? दुसऱ्या देशात सेटल होऊ शकेन, असे
वाटते का? सध्याच्या व्यवसायापेक्षा पूर्ण वेगळा व्यवसाय करणे जमेल का?
नवीन भाषा शिकायला आवडेल का? एखादी खोल रुजलेली निर्थक भीती काढण्यासाठी
प्रयत्न करावेसे वाटतात का? नवीन काही शिकणं टाळण्यामागचं कारण मला कष्ट
नकोत, सुखाचा जीव दु:खात घालायचा नाही हे आहे का? मला बौद्धिक, वैचारिक
किंवा शारीरिक आळस आला आहे का? अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांतून
आपल्या 'कम्फर्ट झोन'बद्दलची स्पष्टता येते. त्यातून स्वत:ची समस्या नेमकी
झाली की, आपण तिच्या स्वीकारापर्यंत पोहोचतो. समस्या स्वीकारणं ही सर्वात
अवघड अशी पहिली पायरी. त्यानंतर तिला सोडवण्याच्या दृष्टीने आपोआप विचार
चालू होतो.
ज्याचे त्याचे 'कम्फर्ट झोन' वेगळे, त्याला स्वीकारण्याची, सामोरं
जाण्याची क्षमता वेगळी, त्याच्यावर काम करून पुढे जाण्याच्या इच्छेची
तीव्रता आणि क्षमताही वेगळी. पण तरीही काही गोष्टी लक्षात ठेवता येतील-
जेवढय़ा जास्त ठिकाणी आपण 'सहज' असतो, ताणरहित असतो, तेवढा आपला अनुभवही
(एक्सपोजर) सहजपणानं वाढतो, त्यानुसार नवीन शक्यतांचा आवाकाही वाढतो. एकदा
'कम्फर्ट झोन' म्हणजे काय आणि त्यात अडकल्यानं किंवा बाहेर पडल्यानं काय
होतं, ते समजून घेतलं की शिकायचं असतं ते अनुभवांना वाहनासारखं वापरणं. जसं
एक वाहन चालवता येत असेल तर गाडी किंवा मेक बदलला तरी प्रत्येक वाहन
नव्यानं शिकावं लागत नाही, फक्त थोडीशी सवय करून घ्यावी लागते तसं. नवीन
शिकण्यातून अनुभवायचा तो आनंद आणि त्यातून वाढणारा आत्मविश्वास. एखादी
गोष्ट सवयीनं करणं आणि तीच समजून करणं यातून येणारी समृद्वी, जुन्याच
गोष्टी नव्या कोनातून पाहणं, नवे नवे कोन आणि प्रतलं शोधायला शिकणं याकडे
जेव्हा आपण डोळसपणे पाहायला लागतो तेव्हा 'कम्फर्ट झोन' आपल्याला त्याचा
आनंद घेत वाढायला शिकवतो. तसंच दमछाक झाली तर कुठे थांबायला हवं, तेही
शिकवतो.