Monday, January 14, 2013

आवड आवड असते !



आवड आवड असते !

आ युष्य मजेत जावे असे कुणाला वाटत नाही? फक्त ही मजा आपल्या शरीरातूनच उत्पन्न होते, हे मात्र बऱ्याचजणांना माहीत नसते. म्हणजे असे बघा- तुम्ही महाबळेश्वरला गेला आहात. हवा मस्त आहे. सगळे मस्त बागडताहेत, पण तुमचे पोट साफ झालेले नाही आणि तुमच्या पृष्ठभागाला एक गळू झालेले आहे आणि ते ठसठसते आहे. सारी मजा गेलीच म्हणून समजा. तर ही मजा आपल्याला सदैव घेता यावी यासाठी आपल्याला स्वत:कडे लक्ष देणे आवश्यक असते. हे आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून करू शकतो. असे केले की, मजा करावी लागत नाही, मजा येत राहते.
'जीवनशैली' हा शब्द 'लाइफस्टाईल' या इंग्रजी शब्दाचे भाषांतर म्हणून मराठीत योजिला जातो. शैली हा शब्द खरे तर खूपच व्यक्तिगत आहे. म्हणजे 'अमुक अमुक वादकाची शैली' असा प्रयोग आपण करतो. पण सध्याची जीवनशैली असे म्हटले, की एक सामाजिक आशय त्याला प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे; म्हणजे दुसऱ्यासारखे जगण्याचा प्रयत्न न करता स्वत:सारखे जगण्याकडे लक्ष देणे फार आवश्यक ठरते.
स्वत:सारखे जगायचे म्हणजे कसे जगायचे? तर ज्या जीवनपद्धतीचा अंगीकार केला असता आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारत राहते, ती जीवनपद्धती आपल्या दृष्टीने योग्य असे समजायचे. जर का आपल्या स्वास्थ्यास हानिकारक अशा गोष्टी आपण वारंवार करीत असू आणि शरीर-मन आपल्याला दु:ख या संवेदनेतून सांगत असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपली जीवनपद्धती बदलायला हवी.
आपण जे काही पूर्वसुकृतानुसार शरीर-मन घेऊन जन्माला आलो आणि ज्या परिस्थितीत जन्माला आलो त्या शरीर-मनाचा सवरेत्कृष्ट वापर आपल्याला आपल्या जीवनपद्धतीत करता आला पाहिजे. हे करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आवडते ते शिक्षण घेणे. आपल्याला आवडते ते शिक्षण घेता आले म्हणजे पुढे आवडता व्यवसाय करायला सोपे जाते. सध्याच्या काळात आपल्याला काय आवडते ते बघण्याऐवजी पैसे कुठे जास्त मिळतील हे बघितले जाते, हे फार चुकीचे आहे. ज्यात मन लागत नाही ते शिकणे फार अवघड असते. लहानपणापासूनच मुलामुलींचा कल पाहून चतुराईने त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात काम करता येईल असे पाहणे महत्त्वाचे ठरते. आपल्या आवडत्या विषयाशी संबंधित असे काम करणे हे योग्य जीवनपद्धतीचे दुसरे वैशिष्टय़.
आपल्या आवडत्या विषयात काम करायला मिळणे ही पहिली पायरी असली तरी त्यापासून उद्भवणारा धोका असा की अविश्रांत काम करण्याची वृत्ती उत्पन्न होऊ शकते. श्रीखंड कितीही आवडले तरी खातच बसले म्हणजे अपचन होणारच. म्हणजे वेळच्या वेळी खाणे थांबवणे जसे आवश्यक तसेच कामही वेळच्या वेळी थांबवता येणे आवश्यक असते. आज रोज १६ ते १८ तास काम करणारे अनेक वेठबिगार संगणकतज्ज्ञ पाहिले की खरोखर वाईट वाटते. एखादे वेळेस अगदी २४ तास काम करणे वेगळे आणि रोज १८ तास काम करणे वेगळे. आता या वयात खूप काम करून खूप पैसे मिळवायचे आणि मग आयुष्य 'एन्जॉय' करायचे असा तद्दन बिनडोक विचार या मागे बहुतांश लोकांचा असतो.
आवडते काम हा एक भाग असेल तर आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवणे हा योग्य जीवनपद्धतीचा तिसरा भाग. चित्रापेक्षा चौकट आवडल्याने जे लग्न करतात, त्यांना आयुष्यात पुढे घरी येताना तणाव उत्पन्न होतो, जसे नावडते काम करणाऱ्यांना कामावर जाताना तणाव उत्पन्न होतो. आणि या दोनही गोष्टी बिघडल्या असतील तर मग विचारायलाच नको.
आवडता छंद जोपासणे हा योग्य जीवनपद्धतीचा चौथा भाग. अगदी मनापासून त्या छंदात मश्गुल होणे हे ध्यानधारणेपेक्षा कमी नाही. वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत तुम्ही त्या छंदातले जवळजवळ तज्ज्ञच बनता. मग पुढे या छंदाचे शिक्षण द्यायचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
आपल्या शरीरमनाची सुयोग्य देखभाल करणे हा योग्य जीवनपद्धतीचा पाचवा भाग. त्यासाठी फक्त स्वत:साठी एक तास काढता येणे फार आवश्यक असते. 'व्यायाम' या शब्दाचीच काही जणांना अ‍ॅलर्जी असते. बिचाऱ्यांना त्यात किती आनंद आहे, हे कधीच कळलेले नसते. त्यामुळे ते त्या वाटेलाच जात नाहीत आणि मग 'स्पाँडिलायटिस' 'आथ्र्रायटिस' अशी लेबले घेऊन ते आयुष्य काढतात. आपल्या शरीरातील ताकद, लवचीकपणा आणि दमश्वास हा कायम वाढता ठेवण्याचा प्रयत्न करणे हे त्यासाठी आवश्यक असते. परिस्थिती जशी आहे तशी पाहता येण्यासाठी सतत भानावर राहण्याची कलादेखील साध्य करायला लागते. २४ तास सुयोग्य श्वासात राहणे हे त्यासाठी उपयुक्त ठरते.
आपण जे खातो, त्याचेच शरीर बनते. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना या गोष्टीचे शरीर होऊ द्यायचे की नाही एवढेच ठरवायचे असते. सामान्यपणे जाहिरात केलेल्या गोष्टी न खाणे अगर पिणे आणि नैसर्गिक पदार्थ जमेल तितके खाणे हे महत्त्वाचे. भूक लागेल तरच खाणे हा सोपा नियम पाळावा.
उत्तम वाहन आणि उत्तम कपडे हे जीवनपद्धतीचे महत्त्वाचे अंग आहे. पण माणसामुळे कपडे अगर वाहन शोभून दिसले पाहिजे. छान तब्येतीची मुलगी अगर मुलगा कुठल्याही वाहनावर आले किंवा सामान्य कपडे पेहरून आले तरी छानच दिसतात. मोराची पिसे लावून कावळा मोर होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण कावळा जर कावळा म्हणून वागला तर देखणाच दिसतो.
सध्याच्या जीवनपद्धतीत मूठ जशी बंद करता आली पाहिजे, तशीच योग्य वेळी उघडताही आली पाहिजे. सामान्यपणे उत्तम खाणे, उत्तम पुस्तके, प्रवास, छंद आणि मदत या गोष्टींवर खर्च केल्यामुळे आयुष्याचा स्तर वाढता राहतो. अनेक मित्रमैत्रिणी मिळतात. आयुष्य श्रीमंत होते. चालताना थांबण्याचे भान, तर थांबल्यावर चालण्याचे भान आयुष्याचा तोल बिघडू देत नाही.
कोणत्याही जीवनपद्धतीत कुणाची कॉपी करणे हे सर्वथैव त्याज्य असायला हवे. मी माझ्या मस्तीत राहणार तर तो त्याच्या मस्तीत राहणार. यात मस्ती या शब्दाचा अर्थ उर्मटपणा अगर मस्तवालपणा असा नाही तर आपल्या लयीत आयुष्य काढणे असा आहे. आपल्या आयुष्याची लय ज्याला सापडली त्याला जीवनपद्धती सापडलीच! आता सारे व्यवस्थित होत राहणारच!
या लेखमालेत वरील सर्व अंगांचा आपण विचार करणार आहोत. वरील मुद्दय़ांसोबत प्रासंगिक अशा काही गोष्टीही यात येतील. स्त्री-पुरुष संबंध ही एक अत्यानंदाची गोष्ट असताना त्याचा पूर्ण विचका झालेल्या समाजात आपण राहत आहोत, हे भान आपल्याला आले तर कमीत कमी पुढच्या पिढीला तरी आपण त्यातून मुक्ती देऊ शकू. मजेने आयुष्य काढणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण वापरूयात. हा आपला दु:खी समाज आहे, कारण एकमेकाला त्रास देण्यात आपल्याला मजा येते. कुणी सुखात असलेला आपल्याला बघवत नाही. आपल्या दु:खापेक्षा दुसऱ्याचे सुख आपल्याला जास्त दुखते. कुणी मजेत राहतो आहे याचा अर्थ काहीतरी चूक होते आहे असे मानणारे महापुरुष या समाजात आहेत. आयुष्य म्हणजे केवळ दु:ख म्हणून परलोकाकडे डोळे लावून बसलेल्या अज्ञानी लोकांच्या झुंडी इथे आहेत. दु:ख याचा अर्थ माझे काहीतरी चुकते आहे असा न घेता आयुष्य म्हणजेच दु:ख असा अनर्थ काढून मोकळे होणारे काही कमी नाहीत. आपल्या आयुष्यात मजा सतत आली पाहिजे. करायला लागता कामा नये, एवढे कळले तरी खूप झाले.

 
***    स्वप्नील  वाघमारे  ***